गावाच्या मध्यावरच होतात अंत्यसंस्कार
By Admin | Updated: October 21, 2014 23:46 IST2014-10-21T21:52:37+5:302014-10-21T23:46:36+5:30
बोर्गेवाडी, भैरेवाडीची स्थिती : शाळेनजीकच अंत्यविधी होत असल्याने मुलांमध्ये भीती

गावाच्या मध्यावरच होतात अंत्यसंस्कार
चाफळ : डेरवण-चाफळ, ता. पाटण ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या बोर्गेवाडी व भैरेवाडी या गावांना स्मशानभूमी शेड नाहीत. डेरवणला स्मशानभूमी शेड आहे; पण तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. बोर्गेवाडी गावाच्या मध्याहून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून शंभर मीटर अंतरावर ग्रामस्थांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. भैरेवाडीचीही तशीच काहीशी अवस्था आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
पाटण तालुक्यातील डेरवण ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोर्गेवाडी गावची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. तर भैरेवाडी गावची लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे. या दोन्ही गावातील बहुतांश तरुण नोकरीच्या निमीत्ताने परगावी वास्तव्यास आहेत. त्यांचे चार-सहा महिन्यांतून गावी कधीतरी येणे-जाणे असते. या दोन्ही गावांना स्मशानभूमी शेड नाहीत. दोन्ही गावांना राजकीय वारसा लाभलेला आहे. तरीही येथील राजकीय मंडळींना स्मशानभूमी शेडचा प्रश्न सोडविता आलेला नाही.
बोर्गेवाडी गावात प्रवेश करताच प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लागते. शाळेपासून अगदी हाकेच्या अंतरावरच स्मशानभूमी आहे. येथे उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात असल्याने त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. अनेकदा मुले शाळेत जाण्यास घाबरत आहेत. स्मशानभूमीच्या आजूबाजूला घरे आहेत. तेथील ग्रामस्थांनाही याचा त्रास होत आहे.
बोर्गेवाडी, भैरेवाडी गावांना स्मशानभूमी आहे. परंतु येथे शेड नाही. विघूत खांब आहे; पण त्यावर दिवे नाहीत. अंत्यविधी करण्यास पै पाहुणे येथे येतात. मात्र त्यांना उभे राहण्यास स्वतंत्र शेड नाही. परिणामी पावसाळ्यांत ग्रामस्थांना रात्रभर जागून अंत्यसंस्कार करावे लागतात. अनेकदा रॉकेल बत्ती अथवा कंदीलाचा आधार घेऊन रात्रभर येथे थांबावे लागते.
वास्तविक, ही दोन्ही गावे महसूली असल्याने ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेले सौरऊर्जेचे दिवे तरी येथे देणे आवश्यक होते, मात्र तसे झालेले नाही.
परिणामी याचा सर्वाधिक फटका दोन्ही गावच्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
गावाला स्मशानभूमी शेड नाही. त्यामुळे उघड्यावरच ओढ्याच्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागतात. शालेय मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी शेड नसल्याने पावसाळ्यात रात्रीच्या वेळी बॅटरी अथवा कंदील,रॉकेल बत्तीचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
- नामदेव मोरे (बोर्गेवाडी)