Satara: फरार आरोपीला बैलगाडी शर्यतीत ठोकल्या बेड्या; मोक्का, अत्याचाराच्या गुन्ह्यात होता पसार
By संजय पाटील | Published: December 23, 2023 04:18 PM2023-12-23T16:18:39+5:302023-12-23T16:19:28+5:30
कऱ्हाड : मोक्का कायदा तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पोलिसांनी बैलगाडी शर्यतीतून उचलले. पाचवडफाटा, ता. कऱ्हाड ...
कऱ्हाड : मोक्का कायदा तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पोलिसांनी बैलगाडी शर्यतीतून उचलले. पाचवडफाटा, ता. कऱ्हाड येथे शेतकऱ्यांच्या वेशात शर्यतीमध्ये घुसून पोलिसांनी ही कारवाई केली.
अक्षय अनिल तळेकर (वय २९, रा. हरपळवाडी, ता. कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील हरपळवाडी येथील अक्षय तळेकर याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात मोक्का कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार होता. फरार असताना त्याने कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबतही कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोन्ही गुन्हे दाखल असताना आरोपी अक्षय तळेकर हा गत काही महिन्यांपासून फरार होता.
दरम्यान, आरोपी अक्षय तळेकर हा पाचवड फाटा येथे आयोजित बैलगाडी शर्यतीत आरोपी येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. अक्षय तळेकर हा शर्यतीतील बैलगाडीवर चालक होता. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांसारखा पेहराव करून पाचवड फाटा येथील बैलगाडी शर्यत गाठली. त्याठिकाणी शिताफीने अक्षय तळेकर याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.