होरपळलेल्या पिकांना झारीने पाणी
By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-29T00:23:25+5:302014-06-29T00:28:34+5:30
शेतकऱ्यांवर आस्मानी संकट : ओढ्याच्या पाण्यावर पिके जगवण्यासाठी धडपड

होरपळलेल्या पिकांना झारीने पाणी
मल्हारपेठ : मान्सूनच्या पावसाने पूर्ण ओढ दिल्यामुळे पेरणीबरोबर उगवलेल्या क्षेत्रावर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही ठिकाणी शेतकरी पेरणी क्षेत्राला झारीने पाणी घालत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाअभावी पेरणीच न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढल्याचे दिसत आहे. पाटण तालुका पूर्णपणे डोंगराळ भागामध्ये विखुरलेला आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी भाताचे पीक घेतले जाते. चाफळ खोऱ्यासह दिवशी, मोरगिरी, कोयनानगरच्या आसपासच्या सर्व वाडी-वस्तीवर अती पावसाचा भाग असल्यामुळे प्रामुख्याने भात शेतीच केली जाते. सध्या परिसरामध्ये सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांनी भात रोपाची पेरण केलेली आहे. सध्या बाजारामध्ये भरपूर जातीच्या भात वाणाची रेलचेल आहे. कमी दिवसात भरपूर उत्पन्न मिळणाऱ्या वाणाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामध्ये मेनका, पार्वती, रूपाली, पूनम आदी नामवंत भाताची वाण बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांनी ती पसंत केली आहेत.
परंतु कृषी महामंडळाने यावेळी बियाणांचा तुटवडा लक्षात घेऊन घरातीलच बियाणे नीटनेटके करून पेरण्याचे आवाहन केल्यामुळे शेतकऱ्यांनी घरातीलच भात बियाणे टाकले असल्याचे दिसत आहे. भाताची रोपे काही ठिकाणी उगवण्याच्या स्थितीत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम झाल्याचे सर्वत्र दिसत आहे. त्यातच कोयना नदीकाठचे क्षेत्र सोडता डोंगर कपारीमध्ये असणारी भात शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.
ऐन वाढीतच पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांना ओढ्याचे पाणी शिंपडावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये ओढ्याच्या पाण्याची पातळीसुद्धा खालावल्यामुळे दिसेल त्या डबकातील पाणी घागरीने आणून रोपांवर शिंपडले जात आहे. (प्रतिनिधी)