रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण
By Admin | Updated: January 19, 2015 00:21 IST2015-01-18T22:10:47+5:302015-01-19T00:21:36+5:30
शेतकऱ्यांत समाधान : तालुक्यात गव्हासह ज्वारीची वाढ अपेक्षित

रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण
कऱ्हाड : तालुक्यात बहुतांशी खरीप वाया गेल्याची हुरहूर मनात कायम असतानाच रब्बीतील पीकस्थिती सुधारली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे़ रब्बीतील गहू आणि संकरित ज्वारीचे पीक सध्या समाधानकारक आहे़
आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान अनुकूल वातावरणात गव्हाची टोकणी व संकरित ज्वारीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे़ पिकांची वाढ सध्या अपेक्षित आहे़ ठिकठिकाणी ज्वारी कोषाबाहेर पडली आहे़ तर गहू पानाबाहेर येऊन दाणे भरण्याच्या स्थितीत आहेत़ संपूर्ण तालुक्यात ही पिके समाधानकारक आहेत़ मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाच्या शक्यतेने पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती़ वातावरण बदलानंतर थंडीची लाट वाढल्याने पिके वाढली़ स्थिती आणखी अनुकूल बनली आहे़ सध्या तालुक्यात गहू चार हजार १६१, संकरित ज्वारी चार हजार ९६३, हरभरा दोन हजार २९५, मका ६५० हेक्टरवर पेरणी झाल्याचे तालुका कृषी विभागातून सांगण्यात आले़ अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्याचे चित्र तालुक्यात होते़ सोयाबीन, ज्वारी पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला होता़ परिणामी उत्पादनातही मोठी घट झाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहेत़ शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बीतील गहू, संकरित ज्वारी या पिकांवरच आहे़ वातावरण अनुकूल राहिल्यास चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे़ (प्रतिनिधी)