लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘वृक्ष जगले तर आपण जगू’ असा साधा-सोपा या प्रकृतीचा नियम आहे. वृक्षांचे हे महत्त्व ओळखून वृक्षसंवर्धनाची चळवळ बळकट करण्यासाठी वाई तालुक्यातील यशवंतनगर येथे राहणाऱ्या रुक्मिणी विठ्ठल डंबे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांनी आपल्या परसबागेत विविध फळ व फूलझाडांची रोपे तयार केली असून, मकरसंक्रातीला ही रोपे वाण म्हणून सुवासिनींना देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. वृक्ष, वेली पर्यावरणाचा सर्वांत महत्त्वाचा घटक. आपल्याला हक्काचा ऑक्सिजन देणाऱ्या या वृक्षांची अलीकडे बेसुमार कत्तल केली जात आहे. सिमेंटच्या जंगलामुळे खऱ्याखुऱ्या जंगलाचे अस्तित्व मात्र हळूहळू नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धन ही काळाची गरज बनू लागली आहे. यशवंतनगर गावात राहणाऱ्या रुक्मिणी डंबे यांनीही वृक्षसंवर्धनाचा वसा घेतला.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रुक्मिणी डंबे यांनी आपल्या परसबागेत आंबा, चिक्कू, फणस, पेरू यांच्या बिया संकलित करून त्यांची परसबागेत लागवड केली. वेळेवर खत व पाणी घालून संगोपन केले आणि बघता-बघता या बियांना अंकुरही फुटले. तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत रोपांची चांगली वाढ झाली. याबरोबरच त्यांनी गुलाब, शेवंती अशा फुलझाडांचीही लागवड केली. मकरसंक्रांतीला महिला एकमेकांना वाण म्हणून कोणती ना कोणती वस्तू भेट म्हणून देत असतात. यावेळी वाण म्हणून रुक्मिणी डंबे यांनी स्वत: जगवलेली फळे व फुलझाडे महिलांना देण्याचा संकल्प केला आहे. याहीपुढे आपली पर्यावरण संवर्धन चळवळ सुरूच राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
(कोट)
दरवर्षी मकरसंक्रांतीला आम्ही काही ना काही वस्तू भेट म्हणून महिलांना देत असतो. यंदा मात्र काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या कालावधीत आम्ही वेगवेगळ्या फळझाडांच्या बिया गोळा केल्या. त्यांचे रोपण केले. ही रोपे आता मोठी झाली असून आम्ही मकरसंक्रांतीला ती वाण म्हणून देणार आहोत. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ हाच त्यामागचा उद्देश आहे.
- रुक्मिणी डंबे, यशवंतनगर, वाई
फोटो : ०८ रुक्मिणी डंबे