रेमडेसिविरचा काळाबाजारप्रकरणी आणखी चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST2021-05-11T04:42:14+5:302021-05-11T04:42:14+5:30
फलटण : फलटण शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना फलटण शहर पोलिसांनी रविवारी सापळा लावून अटक केली होती. त्यांच्या ...

रेमडेसिविरचा काळाबाजारप्रकरणी आणखी चौघांवर गुन्हा
फलटण : फलटण शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना फलटण शहर पोलिसांनी रविवारी सापळा लावून अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सोमवारी पाटण तालुक्यातील तारळे येथील तिघांवर तसेच सातारा शहरातील एकावर गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. रवींद्र रामचंद लाहोटी, अरुण जाधव (रा. तारळे), अमित विजय कुलकर्णी (रा. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटलमधील वार्डबॉय सुनील कचरे हा रेमडेसिविर इंजेक्शनची छापील किमतीपेक्षा ज्यादा दराने म्हणजे ३५ हजार रुपयांना विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून सुनील कचरे व त्याच्याबरोबर असणारा अजय सुरेश फडतरे यांना अन्न व औषध निरीक्षक अरुण गोडसे यांच्या सहकार्याने पकडले होते.
त्यांच्या चौकशीतून प्रवीण मिस्त्री ऊर्फ प्रवीण दिलीप साप्ते (रा. घाडगेवाडी, ता. फलटण) व निखिल घाडगे यांना अटक केली होती. या चौघांवर रविवारी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. चौघांकडे चौकशी केली असता, आणखी काही नावे उघडकीस आली. त्यामध्ये साताऱ्यातील अमित विजय कुलकर्णी (वय ४५) याने संबंधित रेमडेसिविर इंजेक्शन रवींद्र रामचंद्र लाहोटी (वय ३२) याच्याकडून घेतल्याचे उघडकीस आले. दोघांना पहाटे फलटण शहर पोलिसांनी पकडले असून त्यांच्या चौकशीतून तारळे येथील अजित जाधव या मेडिकलवाल्याचे व त्याच्या भावाचे नाव समोर आल्याने जाधव याला अटक केली आहे. त्याचा भाऊ कोरोनाबाधित असल्याने अद्याप त्याला ताब्यात घेतलेले नाही. तपास आणखी पुढे सुरू असल्याची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत केंद्रे यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने रुग्णांचे नातेवाईक मिळेल त्या किमतीने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी इंजेक्शन घेत आहेत. याचा फायदा उठवत फलटणमधील बऱ्याच हॉस्पिटलमधील काही कर्मचारी या इंजेक्शनचा काळाबाजार करीत असून अवाच्या सवा रक्कम घेऊन इंजेक्शन विकत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या.
फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला त्याच्या तिघा साथीदारांसह पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करताना अटक केली. मात्र शहरातील अनेक हॉस्पिटलची चौकशी केली, तर मोठे रॅकेट उघडकीस येऊन यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी विश्वास दाखविला, तर महागड्या किमतीत इंजेक्शन घेतलेले रुग्ण तक्रारीस पुढे येऊ शकतात.
चौकट
इंजेक्शन देऊनही मृत्यू
फलटण शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन दिलेल्या अनेक रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील काही इंजेक्शन्स बोगस असण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने याबाबत संपूर्ण तपास करण्याची मागणी जनतेतून होत आहे.