ग्राउंड रिपोर्ट: चार मंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील ‘जगमीन’च्या ग्रामस्थांची लोखंडी खांबावरून धोकादायक कसरत

By दीपक देशमुख | Updated: July 31, 2025 14:00 IST2025-07-31T14:00:20+5:302025-07-31T14:00:36+5:30

तारळी नदीवर २० वर्षांपासून नाही पुलाचा पत्ता : गावात रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची वानवा

Four Ministers, Deputy Chief Minister's Jagmin villagers in Satara district perform dangerous exercise on iron poles | ग्राउंड रिपोर्ट: चार मंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील ‘जगमीन’च्या ग्रामस्थांची लोखंडी खांबावरून धोकादायक कसरत

ग्राउंड रिपोर्ट: चार मंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील ‘जगमीन’च्या ग्रामस्थांची लोखंडी खांबावरून धोकादायक कसरत

दीपक देशमुख

सातारा : सातारा तालुक्याच्या टोकावरील जगमीन गावातून तारळी नदी वाहते. नदीवर आजतागायत पूल बांधलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी नाइलाजाने उपाय शोधला. त्यानुसार पंधरा-वीस वर्षांपासून वीतभर खांबावरून ग्रामस्थ व शाळकरी मुले धोकादायकरीत्या नदी पार करताहेत. सातारा जिल्ह्यात एक उपमुख्यमंत्री व चार कॅबिनेट मंत्री असतानाही जगमीनचे ग्रामस्थ धोकादायक जीणं जगत असल्याचे विदारक चित्र ‘लोकमत’च्या ग्राऊंड रिपोर्टमधून पुढे आले.

जगमीन हे डोंगर पठारावर वसलेलं साडेतीनशे लोकवस्तीचं गाव. निसर्गाने भरभरून दान दिलं, असलं तरी डोंगराळ भागाचं खडतर जीणंदेखील येथील लोकांच्या नशिबी आहे, हे आयुष्य सुकर करण्यासाठी शासनाचा हात गावात पोहोचत नाही. गावांमध्ये वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी सुविधांचा थांगपत्ता नाही. सततच्या पावसामुळे शेतीही करता येत नाही.

त्यामुळे भूमिपुत्र पोटापाण्यासाठी मुंबईसारख्या शहरात राहत आहेत. त्यांच्या घरातील महिला, मुले, वृद्ध गावातच राहत आहेत. मुख्य रस्त्यांपासून दूर गाव असल्यामुळे साधी काडीपेटी घ्यायची असेल तरी आठ-दहा किलोमीटर चाळकेवाडीत जावे लागते. त्यामुळेच प्रशासनाच्या दृष्टीने या दुर्गम गावातील नदीवर पूल बनण्याची मागणी अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. त्याबाबत ‘लोकमत’शी बोलताना ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मालदेव येथेही पुलाची आवश्यकता..

सातारा-ठोसेघर मार्गावर उजवीकडे मालदेव व जगमीनकडे जाण्यासाठी साधा रस्ता आहे. मालदेव येथे ओढ्यानजीक रस्ता पूर्ण उखडला आहे. या ओढ्यावरून पावसाळ्यात पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथे पूल उभारण्याची आवश्यकता आहे.

तारळी नदी ओलांडून उपचार..

जगमीन गावातून तारळी नदी वाहत गेल्यामुळे अलीकडचे आणि पलीकडचे जगमीन अशा दोन वस्त्या झाल्या आहेत. या वस्त्या चाळकेवाडी ग्रामपंचायतीत येत असल्याने तिथेच आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कोणाला उपचाराची गरज भासली तर आठ किलोमीटरचा हेलपाटा नक्की. त्यातच नदी पलीकडील जगमीनचे रहिवासी असले तर लोखंडी खांबावरून रात्रीत नदी पार करण्याचे धाडस करावे लागते. 

शाळा अलीकडे, अंगणवाडी पलीकडे

गावात जिल्हा परिषद शाळा नदीच्या अलीकडे आहे तर पलीकडील बाजूस अंगणवाडी आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा पुलावरून चालतानाच्या व्हायरल व्हिडिओवरून वातावरण तापले आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषदेच्या शाळेतच अंगणवाडीच्या मुलांना बसविल्याचे दिसून आले. तथापि, ग्रामस्थांना नदी पार करण्याचा हाच काय तो खुश्कीचा; पण धोकादायक मार्ग आहे.

तारळी नदीवरील पुलासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुलाला मंजुरी दिली होती. परंतु नवीन सरकार आल्यानंतर मंजुरी रद्द झाली. तरीही पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटून निवेदन दिले आहे. जिल्हा नियोजन आराखड्यात या कामाचा समावेश केल्याने पूल लवकर होईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. - जगन्नाथ माने, सरपंच, जगमीन
 

जगमीन गावातील दोन्हीकडच्या लाेकांना येण्या-जाण्यासाठी याच पुलाचा आधार घ्यावा लागतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट असते. मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहिल्यानंतर पूर्वी एकदा हा लोखंडी खांब वाहून जाण्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा दुर्घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार आहे का? - कोंडिबा डोईफोडे, ग्रामस्थ, जगमीन

Web Title: Four Ministers, Deputy Chief Minister's Jagmin villagers in Satara district perform dangerous exercise on iron poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.