वाहनचालकांच्या गळ्यात चौपदरी लोढणे

By Admin | Updated: April 12, 2015 23:57 IST2015-04-12T21:16:23+5:302015-04-12T23:57:23+5:30

जबाबदारीबाबत चालढकल : शिरवळ-लोणंद-फलटण-बारामती रस्त्याचे काम दोन वर्षांपासून ठप्प

Four-legged necklace of drivers | वाहनचालकांच्या गळ्यात चौपदरी लोढणे

वाहनचालकांच्या गळ्यात चौपदरी लोढणे

नसीर शिकलगार-फलटण -शिरवळ-लोणंद-फलटण-बारामतीया ८५ किलोमीटर रस्त्याच्या अपूर्णावस्थेत असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी मृत्यूचे सापळे निर्माण झाले आहे. फलटण शहरालगत मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही संबंधित यंत्रणा या बाबीकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शिरवळ-लोणंद-फलटण-बारामती या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ‘बांधा, वापरा, हस्तांतरीत करा,’ योजनेनुसार एका मोठ्या कंपनीवर सोपविण्यात आले. सुरुवातीला या कंपनीने वेगात कामाला सुरुवात केली. त्यासाठी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुणे विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, रस्त्याचे काम रखडल्याने गेल्या दोन वर्षांत या रस्त्याची कसलीही देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याचा सातारा विभाग रस्ता आपल्याकडे नसल्याचे कारण देऊन करीत नाही. तर पुणे विभागाचे अधिकारी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देऊन सोयीस्कररीत्या या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.परिणामी या रस्त्यावर ठिकठिकाणी मृत्यूचे सापळे निर्माण झाले असून, त्यावर वाहतुकीदरम्यान अनेक अपघात होत आहेत. अपघातांमध्ये अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे, काहीना महिनोंमहिने दवाखान्यात उपचार घेत मोठा खर्च करावा लागत आहे,तर काहीनी आपले प्राण गमावल्याने त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम खाते या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून रस्त्याची कोणतीही दुरुस्ती देखभाल करीत नसल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नाही.बाणगंगा नदीवरील पुलाचा कठडा अनेक ठिकाणी तुटला असून, पुलाच्या दोन्ही बाजूंला मुख्य रस्ता अनेक ठिकाणी खचला असल्याने तेथेही मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशी अनेक ठिकाणी या संपूर्ण रस्त्यावर असूनही संबंधित यंत्रणा त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. संबंधीत विभागाने हा मृत्यूचा सापळा त्वरित दूर केला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा काही वाहन चालकांनी व्यक्त केला आहे.

सूचना फलकही नाहीत...
फलटण शहरालगत बाणगंगा नदीवरील पूल पास करून शहराकडे जाताना असलेल्या वळणावर हा मुख्य रस्ता मोठ्या प्रमाणावर खचला असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज आला नाही तर वाहन सरळ खोल खड्ड्यात जाण्याचा आणि मोठा अपघात होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशात रस्ता खचलेले ठिकाण लक्षात न आल्याने मोठा अपघात होऊ शकतो. मात्र, तेथे कोणत्याही प्रकारचा सूचना फलक अथवा धोक्याची सूचना देण्याचा प्रयत्न संबंधित विभागाने अद्याप केला नाही.


अपघाताचा धोका कायम
निंभोरे, ता. फलटण येथील बसस्टॉप समोर रस्त्यावर मध्यभागी मोठा खड्डा पडला असून, संबंधितांनी त्यामध्ये डांबराचे रिकामे पिंप ठेवले असल्याने दिवसा वाहने बाजूने जातात मात्र, रात्रीच्या वेळी चालकाला या बॅरलचा अंदाज आला नाही तर तेथेही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच संग्राम पेट्रोल पंपानजीक रस्ता छोटा झाल्याने अपघात होत आहेत.

Web Title: Four-legged necklace of drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.