फोल्डिंग शौचालयाची चलती
By Admin | Updated: January 16, 2015 23:47 IST2015-01-16T20:56:26+5:302015-01-16T23:47:39+5:30
खटावमध्ये मागणी : कमीवेळात होते उभारणी

फोल्डिंग शौचालयाची चलती
खटाव : ‘स्वच्छ भारत’ अभियान सर्वत्र राबविले जात असताना घर तिथे शौचालय ही योजना सर्वत्र साकारली जात आहे. या योजनेत शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे ग्रामीण भागात आता कमी वेळात तसेच कमी खर्चात बांधण्यात येणाऱ्या फोल्डिंगच्या शौचालयाची संकल्पना अधिक प्रचलित होताना दिसून येत आहे. शौचालय बांधकाम हे तसे खर्चिक आहे. असा समज असणाऱ्या लोकांना या शौचालयाची बांधकामाची भूरळ पडू लागली आहे. सहसा शोष खड्डा, तसेच टाकीच्या शौचालयाची पद्धती सर्वत्र पाहावयास मिळतात. यासाठी लागणारा खर्च तसेच, वेळ आणि जागाही अधिक लागते. मात्र नवीन फोल्डिंगच्या शौचालयाची संकल्पना आता सर्वांना आकर्षिक करू लागली आहे. कमी खर्चात म्हणजे १८ ते २० हजारांत हे उभे केले जाते. या शौचालयाच्या भिंती फोल्ड करता येतात. तसेच हे शौचालय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हालवता येते. या शौचालयाच्या वरील भिंती, सह शोष खड्ड्याची टाकी, अथवा टाकीची मागणी असेल तर टाकीदेखील बसवून दिली जाते. यामुळे जागेची बचत होते. तर वरील साचा हा फोल्ड करून कधीही शिफ्टिंग करता येण्यासारखे असल्यामुळे दिसायलाही आकर्षक, तसेच सुंदर व रेखीव दिसणाऱ्या या शौचालय उभारण्यासाठी ग्रामीण भागात मागणी होत आहे.