फळा-फुलांनी बहरला भक्तीचा मळा!
By Admin | Updated: April 22, 2015 00:29 IST2015-04-21T22:48:42+5:302015-04-22T00:29:42+5:30
बाप्पांना अनोखा नैवेद्य : अक्षय्य तृतीयेनिमित्त पंचमुखी गणेश मंदिरात दीडशे किलो फळांची आकर्षक आरास

फळा-फुलांनी बहरला भक्तीचा मळा!
सातारा : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर येथील पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टने बाप्पाला आगळावेगळा नैवेद्य अर्पण केला. विविध फळांनी आणि फुलांनी मंदिरात सजावट करण्यात आली. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात भाविकांनी पहिल्यांदाच श्रद्धेपोटी फळांची आरास केली आहे.गेल्या वर्षी पुणे येथील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आंब्यांची सजावट करून मूर्तीची आरास करण्यात आली होती. हा भक्तिभाव पंचमुखी गणेश मंदिर स्ट्रस्टचे सदस्य उपेंद्र नलावडे यांना भावला. त्याच क्षणी त्यांनी आपणही पुढील वर्षांपासून साताऱ्यात बाप्पांभोवती फळांची आरास करायची, असा संकल्प केला. आदल्या दिवशी उपेंद्र नलावडे यांनी याविषयी भाविकांशी चर्चा केल्यानंतर अनेकजण पुढे आले.मंगळवारी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त साधून पंचमुखी गणेश मंदिर स्ट्रस्टच्या सदस्यांनी जय्यत तयारी सुरू केली. ठराविक भाविकांनी सढळ हाताने मदत करून फळे विकत घेतली. मार्केट यार्ड, मंडईमधून ही फळे घाऊक दराने खरेदी करण्यात आली. मंदिरातील घंटेला फळांचे आच्छादन करण्यात आले होते. मखरही फळांच्या माळांनी मढविले होते. मूर्तीची पार्श्वभूमी फुलांच्या माळांनी सजवलेली होती. श्रींच्या मूर्तीसमोर फळांनी भरलेल्या टोपल्या ठेवण्यात आल्या होत्या आणि चांदीच्या उंबऱ्यालाही फळांची सजावट करण्यात आली होती.साधारणत: ही सर्व फळे विकत घेण्यासाठी भाविकांना १५ हजार रुपये खर्च आला. दोन दिवस ही फळांची आरास मंदिरात तशीच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर या फळांचा प्रसाद भाविकांना वाटण्यात येणार आहे.बाप्पांना दाखविलेला हा आगळ्यावेगळा नैवेद्य पाहण्यासाठी भाविकांनीही आज विशेष गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
भाविकांनी दिले, कलावंतांनी मांडले
या सजावटीसाठी चिकू ५० किलो, सफरचंद १५ किलो, मोसंबी २५ किलो, द्राक्षे ३० किलो, अननस १५, कलिंगड २५, डाळिंब ५ किलो अशी सुमारे १५० ते १६० किलो विविध प्रकारची फळे जमा करण्यात आली. परंतु कार्यकर्त्यांपुढे मोठा प्रश्न होता तो सजावटीचा. फळांच्या सजावटीमुळे मूर्तीच्या पावित्र्याला कुठेही धक्का लागता कामा नये. तसेच मूर्ती आकर्षकही दिसली पाहिजे, यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आग्रही राहिले.
अखेर जीडी आर्टचे शिक्षण घेतलेल्या संस्कृती ग्रुपच्या मुलांना याविषयी सांगण्यात आले. ही मुलेही लगेच तयार झाली. आदल्या दिवशी सायंकाळच्या सुमारास या मुलांनी सजावट सुरू केली. सलग चार तास सजावट केल्यानंतर त्यांनी काम थांबविले. त्यानंतर सकाळी सलग चार तास काम करून मुलांनी सजावट पूर्ण केली.