करपल्या वेलीवर उमलले टवटवीत फूल
By Admin | Updated: December 1, 2014 00:20 IST2014-11-30T21:23:11+5:302014-12-01T00:20:55+5:30
संसार ‘एचआयव्ही’ संसर्गितांचा : चाळीस विवाह यशस्वी

करपल्या वेलीवर उमलले टवटवीत फूल
मोहन मस्कर-पाटील - सातारा --चाळीसहून अधिक ‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गितांना त्यांच्या आयुष्यात नवीन जोडीदार मिळाल्यामुळे करपल्या वेलीवर आता टवटवीत फूल उमलले आहे. विशेष म्हणजे यापैकी सहा दाम्पत्यांनी आवश्यक ती काळजी घेतल्यामुळे त्यांच्या पोटी जन्मलेली नवजात बालके ‘एचआयव्ही निगेटिव्ह’ आहेत. एचआयव्ही संसर्गितांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच हे सारे काही शक्य झाले आहे.
‘एचआयव्ही-एड्स’चा संबंध थेट लैंगिकतेशी आल्यामुळे त्याच्याविषयी समाजात चांगले बोललेच जात नाही. याचा परिणाम असा होतो की, संसर्गितांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि ‘कलंक’ तसेच ‘भेदभाव’ या दोन गोष्टीमुळे संसर्गित मुख्य प्रवाहात यायला तयार होत नाही. मात्र, करुणा पवार आणि सुनीता पवार, मनोज वाघमारे यांनी संसर्गितांसाठी काम करताना त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची योजना आखली आणि त्याचे पुढचे पाऊल म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या वेलीवर विवाहाचे फुल उमलविण्याची मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली. बाधित पुरुष, महिला अथवा तरुण, तरुणींना वैवाहिक जीवन जगता यावे, जगण्याची उमेद कायम राहावी म्हणून त्यांनी एचआयव्ही संसर्गितांच्या विवाह मेळाव्याचे आयोजन केले. गेली आठ वर्षे हा उपक्रम सुरू असून केवळ एचआयव्ही-एड्स संसर्गितांच्या औषधोपचारांची काळजी न घेता त्यांना सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी यानिमित्ताने प्रयत्न केले गेले. विशेष म्हणजे, हे विवाह टिकून आहेत आणि सर्वच्या सर्व दाम्पत्य आपला संसार सुखाने करत आहेत. करुणा पवार यांची ‘एनएसपी प्लस सातारा’ आणि सुनीता पवार यांची ‘साद फाऊंडेशन’ या दोन संस्था ‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गितांसाठी कार्यरत आहेत. त्यांनाही ‘कलंक’ आणि ‘भेदभाव’ या प्रक्रियेतून जावे लागले आहे. संसर्गितांसाठी ‘नांदा सौख्यभरे’ हा उपक्रम राबवून त्यांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद निर्माण केली. ‘एनएसपी’ आणि ‘साद’च्या माध्यमातून झालेले राजेंद्र-कविता, माधुरी-संदीप, योगिता-विजय, अंकिता-सोमनाथ, राहुल-अर्चना, अजित-कल्पना, अर्चना-अजित, जयश्री-राहुल, तानाजी-विद्या, यांचे विवाह यशस्वी ठरले असून, सर्वचजण आपला संसार सुखाने करत आहेत. सहा संसर्गित दाम्पत्य आई-बाबा बनले असून त्यांच्या पोटी जन्मलेली बालके निरोगी आहेत.
नवजात बालके राहिली ‘एचआयव्ही’पासून दूर
सातारा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत ८४० ‘एचआयव्ही’ संसर्गित गर्भवती माता आढळल्या. यापैकी पाच वर्षांतील गर्भवती संसर्गित महिलांची संख्या ३८० आहे. यापैकी ३६६ मातांच्या पोटी जन्मलेली बालके निरोगी तर १४ संसर्गित जन्मली आहेत. ‘एचआयव्ही’ संसर्गित १०० गर्भवती मातांच्या ३० मुलांना संसर्गाची शक्यता असते. यापैकी ५ मुलांना गर्भातच तर १५ मुलांना प्रसूतीदरम्यान आणि १० मुलांना स्तनपानातून संसर्ग होण्याची शक्यता असते. या तीनही टप्प्यांत जर काळजी घेतली तर नवजात बालक ‘एचआयव्ही’पासून दूर राहू शकते. ‘एचआयव्ही-एड्स’ ग्रामीण भागातही विस्तारतोय. ‘एचआयव्ही’ ज्या कारणाने होतो, त्यापैकी संसर्गित गर्भवती मातेपासून तिच्या नवजात बालकास होण्याची एक शक्यता असते. मात्र, तीन टप्प्यांत योग्य काळजी घेतली तर बालक निरोगी जन्मते. विशेष म्हणजे, सातारमध्ये याची सक्षमपणे अंमलबजावणी झाल्याने ३६६ नवजात बालके ‘एचआयव्ही’मुक्त आहेत.
जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांतील एचआयव्ही-एड्स संसर्गित
सालसर्वसाधारणगभर्वतीएकूण
२00४४६९८0५४९
२00५५४६११४६६0
२00६४९४९७५९१
२00७१५९११0९१७00
२00८२२६१९0२३५१
२00९२१२८९९२२२७
२0१0२१९४९२२२८0
२0११२0५२८६२१३८
२0१२१८८३४२१९२५
२0१३१६६0३७१६९७
२0१४९३0२६९५६
एकूण१६२0८८७२१७0८0
मनोजची
उणीव भासते...
‘साद’च्या माध्यमातून सुनीता पवार आणि त्यांचे पती मनोज वाघमारे तर ‘एनएसपी’च्या माध्यमातून करुणा पवार यांनी संसर्गितांसाठी आपले आयुष्य वेचले. संसर्गित पुरुष-महिला पुन्हा अथवा तरुण-तरुणींना वैवाहिक जीवन अनुभवता यावे, जगता यावे म्हणून ‘नांदा सौख्यभरे’ या संकल्पनेअंतर्गत संयुक्तपणे विवाह मेळाव्यांचे आयोजन केले. गेले आठ वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. मात्र, तीन वर्षापूर्वी मनोज यांचे निधन झाले आणि या संसर्गितांच्या आयुष्याच्या जीवनात नवी बीजे रोवणारा तारा निखळला.
...अन् मिळाला आईचा अधिकार
योगिता-विजय (नावे बदललेली आहेत) या एचआयव्ही-एड्स संसर्गितांच्या विवाहाला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा संसार अतिशय सुखात चालला आहे. विजयला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. ती आता बारावीत आहे. विशेष म्हणजे विजयने विवाह केल्यामुळे त्याच्या मुलीला आता आई मिळाली आहे तर पत्नी योगिताला कोणीतरी ‘आई’ म्हणते, याचा फार मोठा आनंद आहे.