पाच वडांचं गाव.. पाचवड त्याचं नाव!--नावामागची कहाणी-नऊ
By Admin | Updated: March 17, 2015 00:09 IST2015-03-16T23:49:37+5:302015-03-17T00:09:14+5:30
अध्यात्मिक परंपरा : भक्कम तटबंदी अन् दगडी घाटांचं देखणं वैभव

पाच वडांचं गाव.. पाचवड त्याचं नाव!--नावामागची कहाणी-नऊ
राहुल तांबोळी -भुर्इंज पुणे-बंगळूर महामार्गावर कृष्णा नदीकाठी वसलेलं टुमदार पाचवड काळाच्या ओघात मोठ्या बाजारपेठेचं गाव झालं आहे. महामार्गावर दिसत असलेलं पाचवड खरं तर या गावाची बाजारपेठ असून या गावाचं देखणेपण महामार्गापासून काही आतमध्ये नदीकाठी आहे. या नदीच्या काठी पूर्वी असणाऱ्या पाच भल्याथोरल्या वडांच्या झाडांमुळे या गावाला पाचवड हे नाव मिळालं. पाचवड गावाला मोठी अध्यात्मिक परंपरा आहे. ते या गावात प्रवेश करताच जाणवतं. कृष्णा नदीकाठी असणारे भव्य आणि देखणे दगडी घाट या गावाचं वैभव आहे. या परिसरातच पाच वडांची झाडं होती. काळाच्या ओघात काही झाडं नष्ट झाली असली तरी त्या झाडांचे रेखीव दगडातील पार त्या झाडांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत.घाटासोबत या गावाला असणारी तटबंदी या गावाचे वेगळेपण दाखवून देते. विशेष म्हणजे या तटबंदीचे आणि तिच्या दरवाजांचे अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. आणखीण वैशिष्ट्य म्हणजे गावातील रस्ते पूर्वीच्या काळात मजबूत दगडांच्या साह्याने तयार करण्यात आले होते. आता त्याचे डांबरीकरण केले असले तरी काही ठिकाणी अजूनही मूळ अवशेष दिसून येतात. या गावाची पूर्वीच्या काळातील सांडपाणी व्यवस्थाही किती मजबूत होती हे अजूनही दिसून येते. महामार्ग झाल्यानंतर पाचवड गावाची बाजारपेठ गावापासून काही अंतरावर महामार्गालगत स्थिरावली. वाई, जावळी आणि सातारा तालुक्याचे तीनही रस्ते या ठिकाणी एकत्रित येत असल्याने या बाजारपेठेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
दीड शतकी महोत्सवाची परंपरा
पाचवड गावाला उज्ज्वल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. येथे साजरा होणारा कज्जलेश्वर उत्सव यंदा तब्बल १५३ वर्षे पूर्ण करत आहे. या उत्सवात धार्मिक कार्यक्रमासोबत राष्ट्रीय, आंतररष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम गायकांचे गायन, व्याख्यान, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होत असतात. एखाद्या छोट्या गावात सलग १५३ वर्षे चालणारा असा हा आगळावेगळा महोत्सव हे पाचवड गावचे वैशिष्ट्य आहे.
- वैशाली भट
गावाला उज्ज्वल वारसा
सरदार नातू यांना हे गाव इनाम मिळाले होते. त्या काळात या गावात त्यांचे पाच वाडेही होते. सरदार नातूंनीच हे गाव वसवले. येथे बांधण्यात आलेले घाट, मंदिरे, तटबंदी, धर्मशाळा, फारसे कुठे न दिसणारे दगडी रस्ते अशा अनेक कामांत सरदार नातूंचे योगदान आहे. या आगळ््या वेगळ्या योगदानातून या गावाला उज्वला वारसा लाभला असून नंतरच्या काळात ग्रामस्थांनी तो वाढवला.
- वसंतराव शेंडे