पाच महिन्यांत फळांचा राजा परतला!
By Admin | Updated: February 29, 2016 00:59 IST2016-02-28T23:39:00+5:302016-02-29T00:59:31+5:30
खातोय भलताच भाव : एक हापूस आंबा चक्क १२५ रुपयांना

पाच महिन्यांत फळांचा राजा परतला!
सातारा : फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. अवघ्या पाच महिन्यांत या राजाचे साताऱ्यात पुनरागमन झाले आहे. मात्र तो सध्या भलताच भाव घात आहे. सिंधुदुर्गमधून आलेला एक आंबा घेण्यासाठी तब्बल सव्वाशे रुपये मोजावे लागत आहेत. सातारा जिल्ह्यात आंब्याला चांगली बाजारपेठ आहे. त्यामुळे सर्वच जातींचे आंबे वेगवेगळ्या प्रांतातून साताऱ्यात येत असतात. गेल्या हंगामात आॅगस्टमध्ये मलगोबा जातीच्या आंब्याने सातारकरांचा निरोप घेतला होता. यंदा पोषक वातावरणामुळे आंब्याला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. सातारा येथील बाजारपेठेत गेल्या आठवड्यात सुमारे पाच पेट्या सिंधुदुर्गमधून विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र, डझनाला १५०० ते १६०० रुपये दर निघाला असल्याने सध्या मागणी कमी आहे. तरीही चार-पाच डझन आंब्याची विक्री झाली आहे. हंगामातील पहिल्या आंब्याची चव चाखण्यासाठी काही सातारकर जादा पैसे मोजून हापूस खरेदी करत आहेत. (प्रतिनिधी)
बागा विकत
घेण्यासाठी लगबग
यंदाचे वातावरण आंब्यासाठी पोषक असल्याने आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक व्यापारी आंब्याच्या बागाच विकत घेण्यासाठी तयारी करत आहेत.
कोकण, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात येथील एप्रिल महिन्यात हापूस, पायरी, नीलम, तोतापुरी, लालबाग, केशर जातींच्या आंब्यांची आवक होत असते. त्या काळात दरही कमी होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतो.
- इरफान बागवान,
व्यावसायिक, सातारा