अपघातग्रस्तांसाठी एसटीचे पाच लाख जमा!
By Admin | Updated: April 24, 2016 23:42 IST2016-04-24T21:57:14+5:302016-04-24T23:42:29+5:30
सहाय्यता निधी : कऱ्हाड आगाराची कामगिरी; मृतांचे वारस तसेच जखमींना मिळणार तत्काळ मदत...

अपघातग्रस्तांसाठी एसटीचे पाच लाख जमा!
कऱ्हाड : लाखो प्रवाशांना आरामदायी प्रवासासह बळकट सुरक्षा देण्यासाठी एस. टी. महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यातीलच एक म्हणजे, अपघातग्रस्तांच्या आर्थिक सहाय्यता निधीत वाढ केली आहे. यानुसार १ एप्रिलपासून प्रत्येक प्रवाशांकडून वाढीव एक रुपया घेण्याचा निर्णय घेतला गेला.
या निर्णयानुसार कऱ्हाड आगार प्रशासनाने १ तारखेपासून २३ तारखेपर्यंत ५ लाख ५०० रुपये एकत्रित केले आहे.
परिवहन विभागाच्या नवीन प्रस्तावानुसार एस.टी.च्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यानुसार सध्या कऱ्हाड आगारात आतापर्यंत एकाही एसटीचा अपघात झाला नसला तरी अपघातग्रस्तांसाठी आगार प्रशासनाने तब्बल पाच लाख पाचशे रुपये गोळा केले आहेत.
कऱ्हाड आगारातून दररोज ९८ बसगाड्या ग्रामीण भागात हजारो प्रवासी घेऊन धावतात. त्यानुसार निर्णयाच्या अंमलबजावणीपासून २३ दिवसांत पाच लाख पाचशे प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यांच्याकडून पाच लाख पाचशे रुपये ऐवढे एक-एक रुपयाने पैसे गोळा झाले आहेत.
एस. टी. महामंडळाच्या नवीन निर्णयानुसार प्रवासी मृत्यूस दहा लाख रुपये, कायमच्या अपंगत्वास पाच लाख तर गंभीर जखमीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे.
या मदतीसाठी प्रत्येक प्रवाशांकडून दररोज एक रुपया जास्त आकारले जात आहे. त्याअंतर्गत कऱ्हाड तालुक्यातून चोवीस दिवसांत तब्बल पाच लाख पाचशे रुपये कऱ्हाड आगारास प्राप्त झाले आहेत. तो प्रवासी अपघातग्रस्त
आर्थिक सहाय्यता निधी
म्हणून जमा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
प्रवाशांचा पैसा प्रवाशांसाठी
प्रत्येक दिवशी एक-एक रूपया जमा केल्यास किती रुपये एकत्र केले जातील याचे उत्तम उदाहरण एस. टी. महामंडळ प्रशासनाने यातून दिले आहे. सलग २३ दिवस एक-एक रुपया एकत्र करत पाच लाख पाचशे रूपये आगाराने जमा केले आहेत. ते पैसे अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी वापरले जाणार आहेत.