आधी औषध,मग ‘बांधणी’
By Admin | Updated: July 7, 2015 22:21 IST2015-07-07T22:21:12+5:302015-07-07T22:21:12+5:30
विवाहितेची फसवणूक : मुलगा होण्यासाठी दाम्पत्याकडून लूट

आधी औषध,मग ‘बांधणी’
सातारा : मुलगा होण्यासाठी येथील औद्योगिक वसाहतीजवळील देवऋषी पती-पत्नीने विवाहितेला आधी औषध दिले. ‘गुण’ येत नाही हे बघून ‘बांधणी’चा उपाय शोधला. प्रत्येक टप्प्यावर पैसे घेतले घेतले गेले आणि मुलगा तर झालाच नाही. अखेर या भोंदू दाम्पत्याला कोठडीची हवा खायला लागली.
सारिका राकेश मोहिते या विवाहितेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीत म्हटले आहे की, नंदा वायदंडे (माने) या महिलेशी त्यांची ओळख झाल्यानंतर नंदाने ‘तुला मुलगा नाही का,’ असे विचारले. मुलगा नसल्याचे समजल्यावर नंदाने त्यांना संध्याकाळी घरी बोलावले. संध्याकाळी नंदाने अंगात आणून सारिका यांना सांगितले की, उपाय करण्यासाठी चार हजार रुपये लागतील. नंदाचा पती विठ्ठल वायदंडे हा ‘देवाचं पाहणारा’ म्हणून ओळखला जातो.
सारिका त्यांचे सासरे विश्वास मोहिते यांना घेऊन दुसऱ्या दिवशी नंदाकडे गेल्या. तिला चार हजार रुपये दिले. नंदाने त्यांना पांढऱ्या रंगाचे औषध दिले. औषध पिण्याबरोबरच अंगाला लावायलाही सांगितले. परंतु अनेक दिवस औषध घेऊन आणि अंगाला चोळून काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर पुन्हा नंदाची भेट झाल्यावर ‘मला दिवस गेले नाहीत,’ असे सारिका यांनी नंदाला सांगितले.
यावेळी नंदाने सारिका यांच्यावर त्यांच्या जावेने करणी केल्याचे कारण सांगितले. त्यासाठी ‘बांधणी’चा तोडगा सुचवला आणि नऊ हजार रुपये मागितले. सारिका यांनी सासऱ्यांबरोबर जाऊन नंदाला सहा हजार रुपये दिले. त्यानंतर एका फडक्यात नारळ, लिंबू आणि हळद-कुंकू अशी ‘बांधणी’ तयार करून नंदा आणि तिच्या पतीने दिली. ही ‘बांधणी’ घराच्या आढ्याला महिनाभर टांगूनही काहीच उपयोग झाला नाही.
पुन्हा भेट झाल्यावर नंदाने सारिका यांना घरातील माणसांची माहिती विचारली. सारिका यांची एक जाऊ नांदत नाही, हे समजल्यावर तिला नांदवायला आणण्यासाठी नंदाने चार हजार रुपये मागितले. ‘आता माझ्याकडे पैसे नाहीत,’ असे सारिका यांनी सांगितले असता त्यांच्या कानातील सोन्याचे वेल घेतले. ‘चार-आठ दिवसांनी वेल परत देते,’ असे सांगितले; मात्र पाच महिने झाले तरी परत दिले नाहीत, असे प्रियांका यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांसमोरच ‘चमत्कार’
विठ्ठल आणि नंदा वायदंडे यांना मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासमोर उभे केले. तू ‘देवाचं पाहतोस’ म्हणजे काय करतोस, असे घनवट यांनी विचारले असता विठ्ठलने त्यांना मनातला प्रश्न विचारायला सांगून त्यांच्या टेबलवर गहू पसरले. त्यातील मोजके वेगळे काढले आणि दोन-दोन दाण्यांच्या जोड्या लावल्या. त्या समसंख्येत आल्यावर ‘होय’ असे उत्तर दिले. मग ‘आता तू आत जाणार का,’ असा प्रश्न विचारून गहू पसरायला सांगितले. याही प्रश्नाला त्याने ‘होय’ असे उत्तर दिले.