विवाहात लावलेले फटाके इमारतीत घुसून गोडाऊन पेटले कऱ्हाडातील घटना : दोन दुकानातील साहित्यही जळाले
By संजय पाटील | Updated: December 18, 2022 19:51 IST2022-12-18T19:49:38+5:302022-12-18T19:51:35+5:30
विवाहानंतर फोडलेल्या फटाक्यांमुळे आग भडकली. या आगीत एका गोडाऊनसह दोन दुकाने जळून खाक झाली.

विवाहात लावलेले फटाके इमारतीत घुसून गोडाऊन पेटले कऱ्हाडातील घटना : दोन दुकानातील साहित्यही जळाले
कऱ्हाड : विवाहानंतर फोडलेल्या फटाक्यांमुळे आग भडकली. या आगीत एका गोडाऊनसह दोन दुकाने जळून खाक झाली. कऱ्हाडातील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या जाधव आर्केडमध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हापूर नाका परिसरात रविवारी सायंकाळी एक विवाह समारंभ होता. सायंकाळी अक्षदा पडल्यानंतर युवकांनी आनंदाने फटाके वाजवले. यावेळी फटाक्याचा एक बॉक्स उलटला अन् आतिषबाजीतील काही फटाके नजीकच असलेल्या जाधव आर्केड इमारतीमधील गोडाऊनसह अन्य दुकानांमध्ये जाऊन पडले. परिणामी, फटाके फुटून गोडाऊनसह संबंधित दोन्ही दुकानांमध्ये आग लागली. घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरीकांनी त्याठिकाणी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले.
नजीकच असलेल्या भंगार दुकानातील साहित्यालाही आग लागली. त्यामुळे आग भडकण्याची शक्यता लक्षात घेता नागरीकांनी याबाबतची माहिती पालिकेच्या अग्निशामक पथकाला दिली. त्यानंतर तातडीने अग्निशामक पथक त्याठिकाणी पोहोचले. या पथकाने जिकीरीचे प्रयत्न करुन सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गोडाऊनमधील साहित्यासह फर्निचर व इतर दुकानांतील साहित्य जळून खाक झाले.
या घटनेवेळी कोल्हापूर नाक्यावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे उपमार्गावरील वाहतुकही काहीकाळ ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली.