अखेर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे
By Admin | Updated: December 16, 2014 23:35 IST2014-12-16T22:19:58+5:302014-12-16T23:35:28+5:30
मुहूर्त मिळाला : स्मारकाच्या पूर्ततेच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊल उचलले--‘जीवा’ची बाजी... पण स्मारक कधी?

अखेर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे
जगदीश कोष्टी - सातारा -छत्रपती शिवरायांवरील हल्ला जीवावर उदार होऊन झेलणारे जीवा महाले यांचे स्मारक प्रशासकीय अन् लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे मागे पडले होते. दहा वर्षांनंतर सोमवार, दि. १६ रोजी तिसऱ्यांदा प्रतापगडाच्या पायथ्याला वाडा कुंभरोशी येथील सोळा गुंठे जागेचा प्रस्ताव महाबळेश्वर तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.
हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत प्रत्येक मावळ्याचे योगदान छत्रपती शिवरायांनी जाणले होते. मात्र, हिंदवी स्वराज्यासाठी लढलेल्या जीवा महाले यांच्या स्मारकाच्या बाबतीत दाखविलेल्या उदासिनतेमुळे इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात होती. पुढच्या पिढीला त्यांचे स्मरण व्हावे, यासाठी वीर जीवा महाले यांचे स्मारक व्हावे, अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी २००४ मध्येच स्मारक मंजूर केले होते. त्यानंतर जीवा महाले स्मारक समितीची स्थापना झाली. त्यामुळे काही दिवसांत स्मारक उभारेल असे वाटत होते. मात्र, त्यानंतर तब्बल आठ वर्षे समितीची बैठकच झाली नसल्याचा आरोप जीवा सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
हे स्मारक लवकरात लवकर व्हावे, यासाठी वेळोवेळी आंदोलनाचेही शस्त्र उपसले. गेल्या आठवड्यात पाचगणीतील सलून दुकाने बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला होता.
स्मारकासाठी प्रथम प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला, तर त्यानंतर पुतळ्याच्या पश्चिम दिशेला दुसरी जागा सुचविली गेली होती.
तरीही स्मारकाचा प्रश्न काही सुटला नाही. स्मारकासाठी आता प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या वाडा कुंभरोशी येथील जागा सुचविली गेली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव महाबळेश्वर तहसील कार्यालयाने जिल्हधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.
प्रस्तावाची प्रत मागविली
महाबळेश्वर तहसील कार्यालयाने स्मारकाच्या जागेसंदर्भात नव्याने पाठविलेल्या जागेच्या प्रस्तावाची प्रत मिळावी, अशी मागणी जीवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वीर जीवा महाले स्मारकासाठी वाडा कुंभरोशी येथील सोळा गुंठे जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यासंदर्भात लवकरच कार्यवाही सुरू होईल.
- अतुल म्हेत्रे
तहसीलदार