...अखेर दहा महिन्यांनी भेटले शिक्षक विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:32+5:302021-02-05T09:18:32+5:30
▪️ सर्व खबरदारी घेत शासनाच्या अमलबजावणीचे शाळेकडून काटेकोर पालन लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यातील पाचवी ...

...अखेर दहा महिन्यांनी भेटले शिक्षक विद्यार्थी
▪️ सर्व खबरदारी घेत शासनाच्या अमलबजावणीचे शाळेकडून काटेकोर पालन
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खटाव तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाच्या आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार तब्बल दहा महिन्यानंतर सुरू झाले. गेले नऊ, दहा महिने घरी राहून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शाळा सुरू झाल्याने उत्साह जाणवत होता. शाळेत जाऊन मित्र - मैत्रिणीची भेट तर शिक्षकांशी झालेला संवाद यामुळे या विद्यार्थ्याचे चेहरे प्रथमदर्शनी कावरेबावरे झाले होते. मित्र - मैत्रिणींनी एकमेकांचे चेहरे पाहून समाधान मानले. अखेर दहा महिन्यांनी शिक्षक विद्यार्थी यांची भेट झाल्याने शाळेतील वातावरण एक वेगळ्याच विश्वात घेऊन गेले.
शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व ती खबरदारी घेत आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत अखेर शाळेची घंटा वाजली. ज्या -त्या शाळेतील स्थानिक प्रशासनाने आपआपल्या पातळीवर योग्य ती खबरदारी घेत अध्ययन व अध्यापन सुरू केले. इयत्ता पाचवी ते आठवीची खटाव तालुक्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थीसंख्या पुढीलप्रमाणे - जिल्हा परिषद ८९ शाळा, ३४२ शिक्षक तर २ हजार ३८५ विद्यार्थी. शिक्षण विभाग एक शाळा ३ शिक्षक तर २१ विद्यार्थी. खासगी अंशत: अनुदानित एक शाळा २४ शिक्षक तर १६२ विद्यार्थी. खासगी अनुदानित ५७ शाळा, ६८३ शिक्षक तर १० हजार ९१४ विद्यार्थी. खासगी विनाअनुदानित ५ शाळा, १३ शिक्षक तर ७१ विद्यार्थी. स्वयंअर्थसहाय्यित १५ शाळा, १३६ शिक्षक तर ७५१ विद्यार्थी. समाजकल्याण अनुदानित ४ शाळा , २९ शिक्षक तर २१० विद्यार्थी. समाजकल्याण विनाअनुदानित २ शाळा, १२ शिक्षक तर ५८ विद्यार्थी आहेत. असे एकूण मिळून १७४ शाळा, १२४२ शिक्षक तर १४ हजार ५७२ विद्यार्थी आहेत. यापैकी ३ हजार ४२१ विद्यार्थी पहिल्या दिवशी हजर होते.
सलग नऊ ते दहा महिने घरी राहून अनेक विद्यार्थी कंटाळलेले होते. प्रार्थना नाही, खेळही नाही, छोटी व मोठी सुट्टीसुध्दा नाही. यामुळे वेगळ्याच पध्दतीने सुरू असलेले अध्ययन व अध्यापन यांची सवय होईपर्यंत किती काळ जाणार हे कोणीच स्पष्ट करू शकत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर निर्बंध आलेले आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार असले तरी त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर मात्र कोरोनामुळे काहीशी चिंता जाणवत आहे. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र - मैत्रिणींना भेटता येईल याची ओढ अनेकांना लागली होती. नियमावलीचे पालन करीत एकमेकांचे चेहरे पाहूनच शाळेचा पहिला दिवस कधी संपला, हे विद्यार्थ्यांना समजलेच नाही.
________