मंगळवार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार नाही

By Admin | Updated: June 20, 2014 00:29 IST2014-06-20T00:27:29+5:302014-06-20T00:29:15+5:30

उदयनराजे : शिवाजी वस्तू संग्रहालय, जुन्या पालिका इमारतीची पाहणी

Figures will not be immersed in the pond on Tuesday | मंगळवार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार नाही

मंगळवार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार नाही

सातारा : गणेशोत्सव काळात गणपतीमूर्ती विसर्जनाची पर्यायी व्यवस्था करुन मंगळवार तळ्यात यापुढे एकही मूर्ती विसर्जित होणार नाही, याची काळजी घ्या, असा सज्जड दम आज खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
उदयनराजे यांनी आज सकाळी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाची नूतन इमारतीचे बांधकाम, तसेच मंगळवार तळे व राजवाड्यालगत नगरपालिकेच्या जुन्या इमारतीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मंगळवार तळे, मोती तळे व नगरपालिकेची जुनी इमारत यांचा विकास आराखडा सादर करून जिल्हा नियोजन समितीतून त्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद राजभोज, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण उपस्थित होते.
खासदार भोसले यांनी सकाळी छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मंगळवार तळ्याची पाहणी केली. तळ्याचा गाळ काढण्याचे काम अर्धवट आहे. पाणी उपसल्यामुळे न विरघळलेल्या मूर्ती उघड्या पडल्याने ओंगळवाणे चित्र दिसत आहे. तळ्याची अवस्था पाहून उदयनराजे यांनी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. तळ्याचा गाळ काढणे, जलशुद्धीकरणाची व्यवस्था, कारंजे, बोटिंग, तळ्याभोवती संरक्षक जाळी आदींचा त्यात अंतर्भाव असावा, असेही त्यांनी सुचविले. त्याचबरोबर तळ्यात मूर्ती विसर्जनास बंदी घालावी. नागरिकांसाठी विसर्जनाची पर्यायी व्यवस्था पाहावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानंतर जुन्या पालिका इमारतीची पाहणी केली. या इमारतीचे नूतनीकरण सुरू आहे. त्यात ‘कला दालन सुरू करावे. मंगळवार तळे, मोती तळे व जुन्या पालिका इमारतीच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार करावा. जिल्हा विकास समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून त्याकरिता निधी उपलब्ध करुन देऊ,’ अशी ग्वाहीही श्री. भोसले यांनी दिली.
छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय इमारतीच्या बाहेर आॅडिटोरियम करावे असे त्यांनी सुचविले. तसेच निधी उपलब्ध असल्याने इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही सांगितले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Figures will not be immersed in the pond on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.