मजुरांच्या ३ हजार एकर जमिनीसाठी लढा
By Admin | Updated: February 1, 2017 23:17 IST2017-02-01T23:17:01+5:302017-02-01T23:17:01+5:30
कामगारांची देणी २०० कोटी : शेती महामंडळाची जागा अल्पभूधारकांना वितरित व्हावी, यासाठी साखरवाडी परिसरात आंदोलन

मजुरांच्या ३ हजार एकर जमिनीसाठी लढा
सातारा/फलटण : ‘राज्यातल्या शेती महामंडळाकडील तीन हजार एकर जमिनींचे वाटप संबंधित कामगार व अल्पभूधारक शेतकरी यांनाच व्हावे, या मागणीसाठी साखरवाडी येथील कामगार नगरीतून लढा सुरू होत आहे. या जमिनीचे फेर वाटप केल्याशिवाय हा लढा आता थांबणार नाही,’ अशी घोषणा समाजवादी शेतकरी, शेतमजूर, पंचायतीचे राज्याध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली.
साखरवाडी, ता. फलटण येथे आयोजित कामगार मेळाव्यात लक्ष्मण माने बोलत होते. यावेळी शिवाजी करे, किशोर काळोखे, हेमंत भोसले, दगडू सस्ते, न. का. साळवे, बापूराव जगताप, विलासराव शिंदे, अमोल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माने म्हणाले, ‘शेती महामंडळातील कामगारांची दयनीय अवस्था झाली आहे. बेकार दीड शतकापूर्वी बांधलेल्या चाळी, गळणारे पत्रे, उद्ध्वस्त झालेल्या भिंती, उजाड झालेली हजारो एकर शेती आणि वीज नाही, पाणी नाही अशा अंधाऱ्या अवस्थेत चाचपडणारी हजारो कुटुंबे हे या शेतमळ्यातील कामगारांचे जगणे आहे. सध्या कामगारांची देणीच सुमरे २०० कोटी इतकी आहे. त्यापैकी केवळ ३५० कामगार जिवंत आहेत. रामराजे समितीने दिलेल्या निर्णयानुसार शेती महामंडळाकडे खंडकरी शेत जमिनींचे वाटप केले. या जमिनीचे वाटप झाल्यानंतर उर्वरित जमीन शेती महामंडळातील कामगार आणि शेतमजूर छोटे शेतकरी यामध्ये वाटण्याची शिफारस केली. २ गुंठे घरासाठी जागा देण्यात यावी, असे ही म्हटले आहे. मात्र, यावर अद्यापही काहीच कार्यवाही नाही. त्यामुळे या लढ्यात अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी, कंत्राटी कामगार, अंगमेहनती कामगार यांना सामावून घेऊन हा लढा तीव्र करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत कामगारांच्या राहत्या घरांचा प्रश्न सोडवला नाही तर कामगार स्वत:च्या मोडकळीस आलेल्या चाळी पाडून टाकतील व नव्याने आपल्या घरांची उभारणी करतील. २० मार्चपर्यंत शासनाने यांच्या जमिनीचा प्रश्न सोडवला नाही तर राज्यभर शेतमळ्यांच्या जमिनीवर परिसरातील शेतकरी सत्याग्रह करून त्या ताब्यात घेतील. या संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला राज्यकर्ते जबाबदार राहतील.’ यावेळी जमलेल्या कामगारांनी हातात झेंडे घेऊन शेती महामंडळ कार्यालयाकडे मोर्चा नेला. या मोर्चाचे नेतृत्व सुभाष जाधव यांनी केले. मेळाव्याचे प्रास्ताविक धनंजय मदने यांनी केले. मच्छिंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)