पन्नास वर्षांच्या लढ्याला आले थोडेफार यश!
By Admin | Updated: January 21, 2015 23:54 IST2015-01-21T20:47:44+5:302015-01-21T23:54:04+5:30
बावडा : गायरान जमिनीबाबत पालकमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

पन्नास वर्षांच्या लढ्याला आले थोडेफार यश!
खंडाळा : हातावरती पोट असणाऱ्या मागासवर्गीय समाजातील अल्पभूधारक, भूमिहीन लोकांना पडिक गायरानातील जमीन कायमस्वरूपी कसण्यासाठी मिळावी, यासाठी बावडा, ता. खंडाळा येथील अनुसूचित जातीतील लोकांचा गेली पन्नास वर्षे लढा सुरू आहे. परंतु, आजतागायत कोणीही दखल घेतली नाही. पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केल्यानंतर या गायरान जमिनी कसण्यासाठी देण्याचा विचार करून योग्य कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. अनेक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नाला चालना देण्याचे काम पालकमंत्र्यांनी केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जातेय. बावडा, ता. खंडाळा येथील गावच्या उत्तर-पूर्वेकडील बाजूस ‘पठार’ शिवारात असणारी गायरान जमीन वनखात्याच्या अखत्यारित आहे. १९५०-५१ मध्ये तत्कालीन ब्रिटिश कलेक्टर यांनी गावास भेट देऊन मागासवर्गीय समाजासाठी अनुरूप भेट म्हणून ही जमीन कसण्यासाठी कायमस्वरूपी द्यावी, असे आदेश दिले होते. त्यासाठी भूमिहीन अल्पभूधारक शेतकऱ्यांची सोसायटी स्थापन करण्याची सूचना केली होती. मात्र, समाजातील अज्ञान व निरक्षर लोकांना ते करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित होता. त्यानंतर १९६० ते ७० च्या दशकात खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या समाजातील अल्पभूधारक, भूमिहीन लोकांचे दारिद्र्य मिटविण्यासाठी या जमिनी ताब्यात द्याव्यात, यासाठी आंदोलन केले गेले. त्यावेळी राज्यशासनाने तसे परिपत्रक जारी केले होते. मात्र, अद्यापही त्या जमिनी कसण्यासाठी मिळू शकल्या नाहीत. या हक्कासाठी गेली ४५ वर्षे सर्जेराव भोसले हे लढा देत आहेत. त्यांच्यासोबत इतर ९२ वंचित शेतकरीही आहेत. प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश शिंदे, अंकुश पवार, महेंद्र फडतरे, अनिल भिसे, दीपक भोसले, सर्जेराव भोसले या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. लोकांच्या अडचणी जाणून यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी व केंद्र शासनाकडून परवानगी घेण्याबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना सूचना केल्या. उशिरा का होईना, यावर कार्यवाही सुरू झाल्याने लोकांमध्ये समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी) प्रश्न तत्काळ मार्गी लावावा याच क्षेत्रातील गट नं. १७२ ते २२८ मधील सुमारे २२ एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी पूर्व सूचना न देता संपादित करण्यात आल्या. त्यामुळे सदर समाजामध्ये उपजिविकेसाठी वंचित ठेवल्याची भावना निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. परंतु, आजतागायत कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न तत्काळ मार्गी लावाला अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. बावडा गावातील मागासवर्गीयांना गायरानाचा चांगला पोत असणाऱ्या जमिनी कसण्यासाठी द्याव्यात ही खूप जुनी मागणी होती. खरंतर चांगल्या जमिनी गायरानात गेल्याने हा समाज वंचित आहे. उपजीविकेसाठी त्यांना दुसरे साधन नाही. पालकमंत्र्यांनी तातडीचे दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका घेतली आहे. - अंकुश पवार, बावडा