मेघलदरेवाडीतील एका वस्तीवर पन्नास कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:14+5:302021-06-26T04:26:14+5:30
पुसेगाव : एका बाजूला जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे आशादायक चित्र असतानाच खटाव तालुक्यातील काही गावांमध्ये धोक्याची घंटा वाजत ...

मेघलदरेवाडीतील एका वस्तीवर पन्नास कोरोनाबाधित
पुसेगाव : एका बाजूला जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे आशादायक चित्र असतानाच खटाव तालुक्यातील काही गावांमध्ये धोक्याची घंटा वाजत आहे. जेमतेम आठशे लोकसंख्या असलेल्या मेघलदरेवाडीत (रामोशीवाडी) काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आरोग्य तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकाच वस्तीवर पन्नासहून अधिक बाधित सापडल्याने आरोग्य प्रशासनाबरोबरच आजूबाजूची गावेही हादरून गेली आहेत.
त्यानंतर येथील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर तपासणी शिबिर आयोजित करूनही ग्रामस्थ तपासणी करायला पुढे येत नसल्याने प्रशासनाने जाखणगाव येथील चौकात पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेत येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी करण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे.
पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त शहरांपुरता मर्यादीत होता. मात्र, दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अधिक वाढले आहे. यातून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कामगिरीवर चारीबाजूने टीकांचा भडीमार होताना दिसत आहे. खटाव आरोग्य केंद्राच्या अखत्यारित असणाऱ्या गावांमधील ग्रामस्थांना दहा-दहा किलोमीटरचा प्रवास चाचणीसाठी करायला लागू नये म्हणून येथील थेट गाव, वस्त्या व वाड्यांवर पोहोचून शिबिराचे आयोजन वरचेवर करण्यात येत आहे. मात्र, येथील ग्रामस्थ या चाचण्या सहजासहजी करून घेण्यास तयार होत नसल्याचे दिसत आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी फडतरे, आरोग्यसेवक चंद्रशेखर सावळकर, अंगणवाडी सेविका सुनीता काटकर, आरोग्यसेविका माया पवार, संकेत पवार उपस्थित होते.
फोटो
ग्रामस्थांच्या सहकार्याअभावी प्रशासन हतबल
रामोशीवाडीत मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागल्याने जवळपासच्या वाड्या-वस्त्यांत तपासणी शिबिर भरविण्यात आले. त्यापैकी गादेवाडी येथे शिबिर भरवून एकही ग्रामस्थ तपासणीला फिरकला नसल्याने प्रशासनाला रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. त्यामुळे आता नाईलाजास्तव पोलिसांचा धाक दाखवून जाखणगाव चौकात वरचेवर येईल त्या प्रत्येक प्रवाशाच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. पराग रणदिवे यांनी दिली.
कॅप्शन
२५ पुसेगाव-कोरोना
खेडोपाड्यातील ग्रामस्थ कोरोना तपासणीला सहकार्य करत नसल्याने जाखणगाव येथील चौकात येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने पोलिसांच्या सहकार्याने तपासणी शिबिर भरविण्यात आले आहे. (केशव जाधव)