कोयत्याचा धाक दाखवून कारचालकाला पाच लाखाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:55+5:302021-09-11T04:40:55+5:30
तरडगाव/लोणंद : फलटण तालुक्यातील तरडगाव हद्दीत चारचाकी गाडीवर दरोडा टाकून गाडीच्या काचेवर कोयता मारून अज्ञात पाच चोरट्यांनी गाडीतील ५ ...

कोयत्याचा धाक दाखवून कारचालकाला पाच लाखाला लुटले
तरडगाव/लोणंद : फलटण तालुक्यातील तरडगाव हद्दीत चारचाकी गाडीवर दरोडा टाकून गाडीच्या काचेवर कोयता मारून अज्ञात पाच चोरट्यांनी गाडीतील ५ लाख ९ हजार रुपये रक्कम, मोबाईल असा ५ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार कंत्राटी कामगारांचा पगार करण्यासाठी जात असताना गुरुवारी सायंकाळच्यासुमारास घडला. लोणंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तरडगाव हद्दीतील परहर फाटा ते मॅग्नेशिया कंपनीकडे गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्यासुमारास रस्त्यावरून मजूर ठेकेदार कृष्णात हरिदास गायकवाड (वय ३४, रा. तरडगाव) हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. रेल्वे पुलाजवळ आले असता, त्यांनी गाडीचा वेग कमी केला. त्याचवेळी अनोळखी पाचजण दोन मोटारसायकलींवरून तेथे आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत गाडीच्या काचेवर कोयता मारुन काच फोडली. त्यानंतर गाडीमधील ५ लाख ९ हजार रुपयांची रोकड, मोबाईल व गाडीची चावी असा एकूण ५ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरट्याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर तपास करीत आहेत.