बसखाली चिरडून बालिकेसह पित्याचा मृत्यू
By Admin | Updated: August 17, 2014 00:25 IST2014-08-17T00:25:06+5:302014-08-17T00:25:06+5:30
पोवई नाक्यावर अपघात : कर्नाटक बसचालकाला चोप

बसखाली चिरडून बालिकेसह पित्याचा मृत्यू
सातारा : पोवई नाक्यावरील कालिदास पेट्रोलपंपासमोर एस. टी. बसखाली सापडून बालिकेसह पित्याचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसचालकाला बेदम चोप दिला. ही हृदयद्रावक घटना आज, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
रवींद्र तानाजी लावंड (वय ३०), श्रुती रवींद्र लावंड (६, सध्या रा. दौलतनगर, करंजे-सातारा, मूळ रा. खातगुण, ता. खटाव) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
रवींद्र लावंड हे आज, शनिवारी सकाळी मुलगी श्रुतीला घेऊन दुचाकीवरून (एमएच १२ एच ६७१७) भाजी आणण्यासाठी गेले होते. रविवार पेठेतील भाजी मंडईतून दुचाकीवरून ते परत घरी निघाले होते. त्यावेळी जिल्हा बँकेसमोरून कर्नाटक महामंडळाची एस. टी. बस (केई २२ एफ १९६१) येत होती. या बसने लावंड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. लावंड आणि चिमुकली श्रुती दुचाकीवरून खाली पडले. दोघांच्या अंगावरून एस. टी. बसचे चाक गेले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ होती. त्यामुळे बघ्यांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यातील काही संतप्त नागरिकांनी बसचालकाला बेदम चोप दिला. त्यामुळे पोवई नाक्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काही वेळानंतर पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे घटनास्थळी पोहोचले. जमावाच्या तावडीतून सोडवून चालकाला त्यांनी रुग्णालयात दाखल केले.
रवींंद्र लावंड हे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत काम करीत होते. काही वर्षांपूर्वी ते साताऱ्यात स्थायिक झाले होते. त्यांची पत्नी शिक्षिका आहेत, तर श्रुती ही पहिलीमध्ये शिकत होती. पती व मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याने पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)