श्रावणातील उपवास महागला; शेंगदाणे, साबुदाणा किलोमागे १० रुपयांची वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST2021-08-26T04:41:42+5:302021-08-26T04:41:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : श्रावणापासून पुढे सण आणि उपवासाचे दिवस अधिक संख्येने होतात. त्यामुळे फराळाच्या साहित्यांना अधिक मागणी ...

Fasting in Shravan is expensive; Peanuts, sabudana increase by Rs 10 per kg! | श्रावणातील उपवास महागला; शेंगदाणे, साबुदाणा किलोमागे १० रुपयांची वाढ !

श्रावणातील उपवास महागला; शेंगदाणे, साबुदाणा किलोमागे १० रुपयांची वाढ !

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : श्रावणापासून पुढे सण आणि उपवासाचे दिवस अधिक संख्येने होतात. त्यामुळे फराळाच्या साहित्यांना अधिक मागणी राहते. परिणामी, दरात वाढ होते. आताही शेंगदाणा आणि साबुदाणाच्या भावात सरासरी १० रुपयांची किलोमागे वाढ झालेली आहे. यापुढेही सणाचे दिवस असल्याने दीड महिना तरी भाव असाच राहण्याची शक्यता आहे.

सणांचा महिना म्हणून श्रावणाकडे पाहिले जाते. या महिन्यात अनेक जण श्रावणी म्हणून दररोज उपवास करतात. तर काही जण आठवड्यातील ठराविक दिवशी उपवास धरतात. यामुळे श्रावणात फराळाच्या साहित्याला मागणी अधिक राहते. त्यातच मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्यास फराळांच्या साहित्यांचे दर वाढत जातात.

आताही फराळ साहित्य दरात वाढ झालेली आहे. साबुदाण्याला किलोमागे १० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. तर शेंगदाण्यामागेही याच तुलनेत वाढ आहे, तसेच भगरलाही मागणी असल्याने किलोमागे १० रुपये वाढ झालेली आहे. यामुळे सणात उपवास करणे आणखी महाग झालेले आहे.

.................................

असे वाढले दर प्रति किलो...

श्रावणाआधीचे दर

आताचे दर

साबुदाणा ५५ ६५

शेंगदाणा १०० ११०

.................................

सणामुळे मागणीत वाढ...

वरी

- सध्या नाशिकसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात वरीच्या पिकांचे उत्पादन घटले आहे. वरीला सणात मागणी असते.

- सध्या श्रावणाचा सण असल्याने उपवासासाठी वरीच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे दरातही किलोमागे १० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

........................

शेंगदाणा

- देशात शिल्लक असलेला शेंगदाणा संपण्याच्या मार्गावर आहे. गुजरातमध्येही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच शेंगदाण्याला मागणी वाढली आहे.

- बाजारात मोठ्या प्रमाणात शेंगदाणा उपलब्ध झाल्यास दर स्थिर असतात; पण सध्या उपवासामुळे दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

.........................................

साबुदाण्याला मागणी वाढली...

श्रावण महिना हा उपवासाचा म्हटला जातो. या महिन्यात घरोघरी फरळाचे पदार्थ दिसून येतात. त्यामुळे साबुदाण्याला मागणी मोठी आहे. परिणामी, दर वाढत चालले आहेत. श्रावणाआधी १०० रुपये किलो विकला जाणारा साबुदाणा आता ११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

यापुढेही सणाचे दिवस आहेत. त्यामुळे दरात उतार येण्याची शक्यता कमी आहे.

........................................

उपवासाच्या सहित्याला मागणी...

श्रावण महिना हा उपवासाचा असतो. या महिन्यात उपवासाच्या साहित्याला मागणी वाढते. त्यामुळे दरवाढ ही ठरलेली असते. आताही साबुदाणा, शेंगदाणा दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्यातरी किलोमागे सरासरी १० रुपयांची वाढ आहे.

- संजय भोईटे, दुकानदार.

...............................................................

Web Title: Fasting in Shravan is expensive; Peanuts, sabudana increase by Rs 10 per kg!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.