फलटणमध्ये पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:48+5:302021-09-11T04:40:48+5:30
फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हॅली डिस्लरीची सन २०१७ ते २०२० या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना ...

फलटणमध्ये पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच
फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना व नीरा व्हॅली डिस्लरीची सन २०१७ ते २०२० या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅच्युईटी व अन्य रक्कम व्यवस्थापनाने अद्याप न दिल्यामुळे ती मिळविण्यासाठी सेवानिवृत्ती कामगार संघटना व फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या वतीने फलटण येथील तहसील कार्यालयाबाहेर पाचव्या दिवशीही बेमुदत साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात आले होते.
श्रीराम कारखाना व अर्कशाळेतील कामगारांची सन २०१२ ते २०१७ या कालावधीतील ग्रॅच्युईटी व अन्य देणी मिळविण्यासाठी यापूर्वीही फलटण तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून दि. ९ ते २९ नोव्हेंबर २०२० रोजी बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले होते. दि. २९ नोव्हेंबर रोजी कारखाना व्यवस्थापनाने येऊन कामगारांशी चर्चा करून ग्रॅच्युईटी व अन्य देणी फेब्रुवारी २०२१ अखेर अदा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. त्यावर कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्वासनामुळे उपोषण स्थगित केले. तथापि, कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्वासानुसार साडेपाच महिने उलटून गेले तरी अद्याप ग्रॅच्युईटी व अन्य देणी दिली नसल्याने सोमवार, दि. ६ सप्टेंबरपासून आम्ही फलटण येथील तहसील कार्यालयासमोर जोपर्यंत आमची हक्काची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषणाला बसलो असून, साखळी उपोषणात काही बरेवाईट झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी श्रीराम कारखाना व्यवस्थापनाची राहील, असा इशारा नरसिंह निकम यांनी दिला आहे. आज उपोषणस्थळी येऊन भाजपचे तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमिरभाई शेख, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताप पठाण, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी पाठिंबा देत उपोषणात भाग घेतला.
१०फलटण
फलटण येथील उपोषणस्थळी ॲड. नरसिंह निकम, बजरंग गावडे, आमिरभाई शेख, युवराज शिंदे, ताजुद्दीन बागवान, अल्ताप पठाण, रवींद्र फडतरे आदी उपस्थित होते.