दराअभावी शेतकऱ्यांना बाजरी लागणार कडू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:01+5:302021-09-13T04:38:01+5:30
आदर्की : फलटण तालुका रब्बीचा असला तरी खरीप हंगामात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु गतवर्षी उत्पादनात वाढ ...

दराअभावी शेतकऱ्यांना बाजरी लागणार कडू!
आदर्की : फलटण तालुका रब्बीचा असला तरी खरीप हंगामात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु गतवर्षी उत्पादनात वाढ व बाजरीचे निर्यात न झाल्याने बाजरीचा दर कवडीमोलच असल्याने या वर्षी फलटण तालुक्यात बाजरी पेरणी कमी झाली, नवीन बाजरी काढणीस आली तरी बाजरीचे दर जैसे थे असल्याने ग्राहकांना बाजरी गोड तर शेतकऱ्यांचे तोंड कडू होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात खरीप हंगामात बाजरी पीक मोठ्या प्रमाणात घेतली जात होते; पण शेतकरी नगदी पिकाकडे वळला आहे तर फलटण-खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे ऊसक्षेत्रात वाढ झाली आहे.
गत सात वर्षांत संकरित बाजरी बियाणे उपलब्ध झाल्याने कमी क्षेत्रात जादा उत्पादन मिळू लागले. गतवर्षी फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊसबिले वेळेत दिली नाहीत. त्यामुळे ऊसक्षेत्र कमी होऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला, कांदा व बाजरीची पेरणी केली. तसेच पाऊसही वेळेवर पडल्यामुळे बाजरी पिके जोमात येऊन उत्पादन चांगले मिळाले.
कोरोना महामारीमुळे बाहेरच्या देशातील निर्यात बंद राहिल्याने शेतकऱ्याकडे बाजरी मोठ्या प्रमाणात पडून राहिली. स्थानिक बाजारपेठा, आठवडा बाजार बंद आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने दर मिळत नाही याचा विचार करून शेतकऱ्याने या वर्षी बाजरी पिकाची पेरणी कमी प्रमाणात केली असली तरी गतवर्षीची बाजरी पडून आहे. त्यामुळे या वर्षीही बाजरी उत्पादन होणार आहे. मात्र बाजरीला दर मिळणार नसल्याने ग्राहकांना बाजरी गोड लागणार असली तरी शेतकऱ्यांना दराअभावी कडू लागणार असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.
कोट..
बाजरीला दर नसल्याने गतवर्षीची बाजरी शिल्लक आहे. या वर्षी संकरित बाजरी एक पिशवी पेरली. तिची उगवण चांगली झाली. ऐनवेळच्या पावसामुळे पाणी देण्याची गरज भासली नाही. उत्पादन चांगले मिळाले; पण नांगरणी, पेरणी, खते, काढणी, मळणी, मजुरीचा खर्च व लॉकडाऊनमुळे दर नाही. त्यामुळे उत्पादन जादा मिळूनही दर नसल्याने बाजरी पीक परवत नाही.
-हणंमतराव मुळीक, शेतकरी, मुळीकवाडी
१२आदर्की
फोटो -आदर्की परिसरात बाजरी पीक काढणीस आली आहे.