शिक्के उठविण्यासाठी सात गावांतील शेतकरी एकत्र
By Admin | Updated: August 9, 2016 23:53 IST2016-08-09T23:41:12+5:302016-08-09T23:53:13+5:30
खंडाळ्यात उपोषण सुरू : प्रश्न मार्गी लावण्याचे रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील यांचे आश्वासन

शिक्के उठविण्यासाठी सात गावांतील शेतकरी एकत्र
खंडाळा : औद्योगिकीकरणासाठी अधिग्रहीत जमिनीवरील शिक्के उठविण्यासाठी खंडाळ्यातील सात गावांतील शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला. शिक्के उठविण्यासाठी ठोस भूमिका शासनपातळीवर घेतली जात नाही. तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
खंडाळ्यातील बावडा, खंडाळा, मोर्वे, अहिरे, शिवाजीनगर, म्हावशी, भादे या गावांतील १६८० हेक्टर क्षेत्रांवरील औद्योगिकीकरणास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील शिक्के काढून शेतकऱ्यांना त्या कसण्यासाठी रिकाम्या कराव्यात. ही शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी सातही गावांतील शेतकऱ्यांनी क्रांतीदिनाचे औचित्य साधून खंडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून मूक मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणास प्रारंभ केला. सात गावांतील तीस शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र, शेकडो शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
या उपोषणाची दखल घेऊन सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत
यांच्या समवेत शेतकऱ्यांची चर्चा केली. जमिनीवरील शिक्के काढण्यासंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्याशी मुंबई येथे एक बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, जोपर्यंत राज्यकर्ते दखल घेत नाहीत. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. (प्रतिनिधी)