खटाव परिसरातील शेतकरी पेरणी कामात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:04 IST2017-11-01T11:53:07+5:302017-11-01T12:04:03+5:30
सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने खटावसह परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये तसेच शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.

रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व अन्य पिकांच्या पेरण्याची लगबग सध्या सर्व शिवारात सुरू आहे.
खटाव : सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने खटावसह परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पेरण्यामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये तसेच शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.
खटाव तसेच परिसरातील गावांमध्ये परतीच्या पावसाने चांगलीच हजेर लावली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिके काढणीस विलंब झाला. त्याचबरोबर मोठ्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसानही झाले.
त्यातच खरीप पिके शेतातच असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पूर्व कोणतीच मशागत करता आले नाही. त्यामुळे रब्बी पीक कसे घ्यायचे याची चिंता लागून राहिली होती. सध्या पडलेल्या उघडीपीमुळे शेतकरी पुन्हा एकदा कामात व्यस्त झाला आहे.
पावसामुळे शेतात सर्वत्र गवताचे साम्राज्य वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पहिल्यांदा त्याचा बंदोबस्त करण्याची समस्या उभी राहिली आहे. मजूर लावून ती स्वच्छता करून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू असल्याचे चित्र सध्या खटाव परिसरात पाहायला मिळत आहे.
रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व अन्य पिकांच्या पेरण्याची लगबग सध्या सर्व शिवारात सुरू आहे.