श्रमदानातून साकारले शेततळे व स्मशानभूमी
By Admin | Updated: May 1, 2015 00:16 IST2015-04-30T23:22:50+5:302015-05-01T00:16:34+5:30
कासाणी ग्रामस्थांची एकी : शासकीय अनुदानाशिवाय केले काम पूर्ण

श्रमदानातून साकारले शेततळे व स्मशानभूमी
बामणोली : ‘गाव करील ते राव करील काय?’ या ग्रामीण म्हमीप्रमाणे कासाणी, ता. सातारा या कास पठारालगतच्या दुर्गम गावकऱ्यांनी अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखविली.ग्रामस्थांनी कोणत्याही अनुदानाशिवाय शेततळे आणि स्मशानभूमी रस्ता श्रमदानातून बांधला. २०१३ मध्ये पावसाळ्यात याच गावातील शेकडो जनावरे अतिवृष्टीने दगावली होती. तसेच एका शेतकऱ्याचा थंडीने गारठून मृत्यूही झाला होता. घाटाईदेवी मंदिरालगत असणाऱ्या या गावात मुरघ रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटरचा उताराचा कच्चा रस्ता आहे. पावसाळा सुरू झाला की, हा रस्ता पाऊस व चिखलामुळे बंद होतो. त्यामुळे गावकऱ्यांनी गावापासून दोन किलोमीटर डोंगरातून डांबरी रस्त्यापर्यंत पायपीट चालू होते. सध्या या रस्त्याचे खडीकरणाचे व डांबरीकरणाचे काम चालू आहे. गावाबाहेर ‘वेताळचा माळ’ परिसरात एक पाणवठा आहे. या पाणवठ्यातील पाणी वाहते असल्यामुळे ते न अडविल्यामुळे वाया जाते. या पाण्याचा सदुपयोग करता येईल का? या उद्देशाने ग्रामस्थांनी एकसंधतेने निर्णय घेऊन ग्रामविकास मंडळाकडे गावच्या काही शिल्लक रक्कमेतून व कास पठारावरील वनकमिटीकडे जमा शुल्कातील काही रक्कम काढून श्रमदान व मजुरी करून या पाणवठ्याच्या जागी शेततळे बांधले. गावातून या शेततळ्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे ७०० मीटर लांबीचा रस्ताही तयार केला.
या शेततळ्यात आज सुमारे ३ लाख लिटरहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. अनेक गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असताना कासाणी गावकऱ्यांनी श्रमदानातून कोणतेही शासकीय अनुदान न घेता हे बांधले आहे.
बांधलेल्या शेततळ्याची पाहणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे करून ग्रामस्थांचे कौतुक केले व इतर गावांनी या गावाचा आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार काढले. ग्रामस्थांनी एकी ठेवली तर डोंगराएवढे काम ते सहज करू शकतात, याची प्रचिती यामुळे आली. (वार्ताहर)
आम्ही सर्व कासाणी ग्रामस्थ महिला, युवकांनी एकमुखाने निर्णय घेऊन गावालगतच असणाऱ्या पाणवठ्यावर शेततळे बांधण्याचे ठरविले. सर्व ग्रामस्थ महिला यांनी सुमारे १५-२० दिवस श्रमदान करून या शेततळ्याचे काम पूर्ण केले. यासाठी ग्रामविकास मंडळ, कासाणी व संयुक्त वन व्यवस्थापन कमिटी, कासाणी यांच्याकडून आम्हाला आर्थिक मदत मिळाली. यासाठी कोणत्याही शासकीय योजनेचा निधी घेतलेला नाही.
- लक्ष्मण बादापुरेअध्यक्ष, वनव्यवस्थापन कमीटी, कासाणी
सर्व कासाणी ग्रामस्थांनी श्रमदानाने स्मशानभूमी रस्ता व शेततळ्याचे काम आम्ही एकसंधतेने पूर्ण केले. शेततळ्यातील पाण्यामुळे आम्हाला शेती तसेच गुरेढोरे जंगली पशु-पक्ष्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. तसेच स्मशानभूमीपर्यंत रस्त्याची ही सोय झाली आहे. आम्ही सर्व कासाणी ग्रामस्थांनी श्रमदान केल्यामुळेच हे सहजशक्य झाले आहे.
विजय बादापुरे,
ग्रामस्थ, कासाणी, ता. सातारा.