कालेच्या मूर्तिकलेला लागली उतरती कळा
By Admin | Updated: January 2, 2015 00:23 IST2015-01-01T21:33:47+5:302015-01-02T00:23:04+5:30
महागाईचा फटका : परराज्यातून येणाऱ्या दगडाचे दर दुप्पट; मूर्तींची मागणी मात्र निम्म्यावर, मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ

कालेच्या मूर्तिकलेला लागली उतरती कळा
काले : काले गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कला म्हणजेच मूर्तिकला़ दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून येथील मूर्तिकार मूर्ती घडविण्याचे काम करीत आहेत़ या मूर्तींना महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही मागणी असते़ मात्र, दगडाच्या किमती वाढल्याने व मूर्तींची मागणीही घटल्याने ही कला धोक्यात आली आहे.
काले गावाच्या प्रवेशद्वारावरच मूर्तिकार मूर्ती बनविण्यात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळते. येथे तयार केलेल्या मूर्तींना महाराष्ट्रातील मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांसह कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यांतही मागणी आहे; पण हीच मूर्तिकला आज संकटात सापडली आहे़ इतर व्यवसायांप्रमाणे मूर्तिकला व्यवसायालाही महागाईचा फटका बसला आहे़ कच्च्या मालाच्या म्हणजेच दगडांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, कुशल व सुबक काम करणाऱ्या मजुरांच्या अभावामुळे मूर्तिकलेला घरघर लागली आहे.
मूर्ती घडवण्यासाठी परराज्यातून दगड आणावा लागतो़ कर्नाटकमधून शाळीग्राम, काळा पाषाण व गोकाकमधून लालदगड आणि राजस्थानमधून मार्बल आणले जाते़ ट्रकद्वारे हे दगड आणले जातात़ दहा टन वजनाच्या दगडासाठी तब्बल साठ हजार रुपये द्यावे लागतात आणि ही रक्कम अॅडव्हान्स द्यावी लागते़ त्यामुळे मूर्ती व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. याआधी दहा टनांसाठी वीस ते तीस हजार रुपये द्यावे लागत होते; आता मात्र तब्बल दुप्पट रक्कम गुंतवावी लागते़ यामुळे भांडवल उभारताना मूर्तिकारांच्या नाकी नऊ येत आहेत.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही; पण हेच घाव घालताना मूर्तिकारांच्या हाताला आलेले फोड कुणाला दिसत नाहीत़ मूर्तिकारांच्या हाताची अवस्था अतिशय बिकट होते़ शिवाय वाकून काम केल्याने पाठदुखीचाही त्रास उद्भवतो. ग्रॅन्डरच्या वापरावेळी दगडाचे कण शरीरात जाण्याने अनेक आजार होतात़ अशा अवस्थेतही अतिशय अल्प मोबदल्यात काम करून मूर्तिकार आपला उदरनिर्वाह करतात़
आजची आधुनिक पिढी मोबाईलच्या वॉलपेपरवरूनच देवदर्शन करत आहेत़ लोकांना धकाधकीच्या जीवनात देवळात जायला वेळ मिळत नाही़ त्यामुळे मंदिरे उभारण्याचे प्रमाणही कमी होत आहे़ एकूणच मूर्तीची मागणीही घटली आहे़ दगडाचे वाढलेले दर आणि मूर्तींची घटलेली मागणी, अशा बिकट अवस्थेतही मूर्तिकार आपली कला जोपासत आहेत़ (वार्ताहर)
दोन फूट मूर्तीचा खर्च दहा हजार
दोन फूट उंचीची दगडाची मूर्ती बनविण्यासाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये दगड दोन हजार रुपये, मजुरी सहा हजार रुपये, नक्षीकाम ५५० रुपये, चेहरा ४५० रुपये, फिनिशिंग ५०० रुपये, सॅम्पल ५०० रुपये असा सर्व खर्च दहा हजार रुपये होते. मात्र, मूर्तीची विक्री फक्त अकरा ते बारा हजारांमध्ये होते.
आमची चौथी पिढी या व्यवसायात आहे़ दिवसेंदिवस मूर्तींची मागणी घटत आहे़, तर दगडाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत़ कसे तरी उदरनिर्वाहापुरते उत्पन्न मिळते; परंतु मूर्तिकला जोपासण्याच्याा समाधानासाठी हा व्यवसाय नेटाने करत आहे़
- पांडुरंग पाटील, मूर्तिकार