सहा महिन्यांच्या तान्हुलीला रस्त्यावर फेकल
By Admin | Updated: January 19, 2015 00:21 IST2015-01-18T22:34:36+5:302015-01-19T00:21:30+5:30
अज्ञाताचे कृत्य : पोलिसांनी केला शोध सुरू; भरतगाव येथे घडली घटनो

सहा महिन्यांच्या तान्हुलीला रस्त्यावर फेकल
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरतगाव येथे कोणीतरी अज्ञाताने सहा महिन्यांची तान्हुली रस्त्यावर फेकून दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. या बालिकेवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, भरतगावचे पोलीस पाटील प्रताप शंकर शेलार यांना रविवारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावर एका कडेला सहा महिन्यांच्या तान्हुलीला फेकून दिल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या तान्हुलीचे नातेवाईक आजूबाजूला कोठे आहेत का, याचा शोध घेतला मात्र, त्यांना कोणी आढळून आले नाही.
दरम्यान, याची माहिती त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास कदम आणि सहायक फौजदार अशोक हजारे यांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी तान्हुलीला नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, पोलिसांनी कोणताही धोका नको म्हणून तान्हुलीला तत्काळ सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक फौजदार अशोक हजारे करत आहेत. (प्रतिनिधी)