फलटणकरांना काळजी ‘काजळी’ची!

By Admin | Updated: January 13, 2015 00:16 IST2015-01-12T21:28:55+5:302015-01-13T00:16:20+5:30

कारखान्याचे कानावर हात : प्रदूषण मंडळाचेही सोयीस्कर दुर्लक्ष

Falakankar care worries! | फलटणकरांना काळजी ‘काजळी’ची!

फलटणकरांना काळजी ‘काजळी’ची!

फलटण : येथील श्रीराम जवाहर साखर उद्योग कारखान्याच्या काजळीने फलटण व आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्रस्त केले असून, सारखी काजळी डोळ्यात जाऊन डोळ्यांना दुखापती होऊ लागल्या आहेत. काजळीने हैराण झालेल्या नागरिकांकडून कारखाना व प्रदूषण नियंत्रण मंडळ आता काय लोकांची आंधळे होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
फलटण शहरात पंढरपूर रोडवर श्रीराम सहकारी साखर कारखाना असून, हा कारखाना जवाहर उद्योगाने भागीदारी तत्त्वावर चालविण्यास घेतला आहे व त्याचे नामकरण ‘श्रीराम जवाहर उद्योग’ असे केले आहे. साखर कारखान्याच्या हंगामात दरवेळी कारखान्यातून निघणाऱ्या काजळीचा नागरिकांना त्रास होत असतो. मात्र, यावर्षी हा त्रास खूपच वाढला आहे.
कारखान्यातून निघणारी काळी काजळी (राख) मोठ्या प्रमाणात बाहेर पसरून वाहनचालक व पायी जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात जात आहे. काजळी डोळ्यातगेल्यावर डोळ्यांची भयंकर आगआग होत आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या तर डोळ्यांत हमखास ही काजळी जात असून, यामुळे अपघाताचेही वारंवार प्रकार घडले गेले आहेत. काजळीमुळे डोळे चोळून आग होण्याने बराचवेळ डोळ्यापुढे अंधारी येत आहे.
कारखान्यातून बाहेर पडलेली काजळी घराबाहेर वाळत टाकलेल्या कपड्यांवर पडून कपडेही खराब होत आहेत. घरातही खिडकीवाटे काजळी आत येऊन भांड्यावर बसत आहे. शहर व परिसरात अनेकजण अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री करीत असतात. यावरही ही काजळी पडून ती काजळी अन्नावाटे पोटात जात आहे व याचा परिणाम पोटदुखीवरही होत आहे. काजळीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून, काजळी नियंत्रणात आणण्यासाठी असणारी यंत्रणा कारखान्याने बसविली नसल्याने काजळी सर्वत्र पसरून याचा त्रास नागरिकांना होत आहे.
काजळी संदर्भात वारंवार कारखान्याला कळवूनही कारखाना प्रशासन लक्षच देत नसल्याचे दिसून येते. प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबतची माहिती असूनही ते आंधळेपणाचे ढोंग घेत सुस्त आहे.

कारखान्यातून निघणाऱ्या काजळीबाबत मी कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन वारंवार समक्ष त्यांना यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. काजळीच्या भयानक त्रास नागरिकांना होत असल्याने व मी स्वत: प्रत्यक्ष हा त्रास अनुभवल्याने आता कारखाना प्रशासन लक्ष देत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार आहे. तसेच वेळप्रसंगी मनसे स्टाईलने आंदोलन करू.
- युवराज शिंदे, मनसे, उपजिल्हाप्रमुख


डोळ्यात काजळी गेल्याने आग होते. डोळे सुजणे, लाल होणे असे प्रकार होतात. नाका-तोंडात काजळी गेल्याने धाप लागते. एखाद्याला मधुमेह ुअसल्यास त्याच्या डोळ्यात काजळी जाऊन दुखापत झाल्यास गंभीर परिस्थिती उद्भवते. काजळीचा त्रास तातडीने बंद झाला पाहिजे.
- डॉ. सुभाष गुळवे,

आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
कारखान्यातील काजळीचा त्रास फलटणकरांना चांगलाच होत आहे. या त्रासातून ना चिमुकल्यांची सुटका ना ज्येष्ठांची. डोळ्यातून वाहणारे पाणी पुसुन कधी यातून सुटका मिळणार असा सवाल स्थानिकांना पडला आहे. तर निद्रिस्त अवस्थेत असलेल्या प्रदुषण महामंडळानेही याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

Web Title: Falakankar care worries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.