‘सुपारी’ शाबीत करण्यात अपयश

By Admin | Updated: September 30, 2014 00:06 IST2014-09-30T00:02:57+5:302014-09-30T00:06:28+5:30

बचाव पक्षाचा दावा : सल्याच्या घरी सापडलेली रक्कम ‘ती’ नव्हेच !

Failure to prove 'betel' | ‘सुपारी’ शाबीत करण्यात अपयश

‘सुपारी’ शाबीत करण्यात अपयश

सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खुनासाठी मुख्य सूत्रधाराने गुंड सल्या चेप्याला दोन लाखांची सुपारी दिली होती, ही बाब शाबीत करण्यात सरकार पक्षाला अपयश आल्याचा दावा बचाव पक्षातर्फे आज,सोमवारी न्यायालयात करण्यात आला. सल्याच्या घरातून जप्त केलेले दोन लाख रुपये सुपारीचेच होते, हे सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाकडे ठोस पुरावे नाहीत, असा युक्तिवाद अ‍ॅड. श्रीकांत जाधव यांनी केला.
जाधव म्हणाले, ‘या खटल्यातील साक्षीदार अभय पाटील हा अतुल भोसले यांच्या शिक्षण संस्थेत काम करतो. हे त्याने आपल्या जबाबात सांगितले नव्हते. सर्व आरोपींना मयत संजय पाटील ओळखत होते. ज्यावेळी ही घटना घडली. तेव्हा तेथे पिस्तूल घेऊन दोघे उभे होते. मात्र, संजय पाटील यांनी तोंडातून चकारशब्दही काढला नाही. हे विसंगत असल्याचे अ‍ॅड. जाधव यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले.
जाधव म्हणाले, ‘कोयना बँकेमध्ये उदय पाटीलबरोबर सल्या चेप्याला पाहिल्याचे साक्ष काहीनी दिली होती. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. सर्व आरोपींबाबत माफक पुरावा नाही. शिक्षा करतो, असे मनात आणले तरी शिक्षा देण्याइतपत पुरावे नाहीत. सागर परमार, हमीद शेखने हत्यारे काढून दिली. त्यावेळी सरकारी नोकरांना पंच म्हणून हाताखाली घेतले. हत्यारे जप्त केलेल्या ठिकाणाची चतु:सीमा एकच आहेत. मात्र त्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. अतुल भोसले, शशिकांत शिंदे आदी समर्थकांनी मोर्चा काढला. त्यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी पाटील मोर्चामध्ये सहभागी होते. मात्र, ते त्याच दिवशी पंचनामा केल्याचे सांगतायत. जप्त केलेली हत्यारे कोठे होती, हे साक्षीमध्ये दाखविले नाही. एकाही हत्यारावर सील केले नसून हत्यार जप्तीचा केवळ फार्स केला आहे,’ असे अ‍ॅड. जाधव यांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. सल्या चेप्या तडीपार होता. त्या कालावधीत पोलिसांनी त्याच्यावर कोणती कारवाई केली, हे समोर आले नाही. या खटल्यातील सर्व साक्षीदार मयत संजय पाटील यांचे मित्र, गाववाले, नातेवाईक आहेत. तसेच घटनेनंतर सल्या चेप्याला कऱ्हाड न्यायालयात गोळ्या घालणारा महेश पाटील हा खटल्यातील पंच साक्षीदार आहे, हे विसंगत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Failure to prove 'betel'