कऱ्हाडच्या वाढीव भागात सीसीटीव्हीचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST2021-06-21T04:25:03+5:302021-06-21T04:25:03+5:30
कऱ्हाड : शहरातील मुजावर कॉलनीसह इतर वाढीव भागात आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. त्यामुळे या भागातील गुन्हेगारी कृत्यांना आळा ...

कऱ्हाडच्या वाढीव भागात सीसीटीव्हीचा डोळा
कऱ्हाड : शहरातील मुजावर कॉलनीसह इतर वाढीव भागात आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. त्यामुळे या भागातील गुन्हेगारी कृत्यांना आळा बसणार असून, येथील हालचालींवर पोलिसांना लक्ष ठेवता येणार आहे. या यंत्रणेचा लोकार्पण सोहळाही लवकरच केला जाणार आहे.
शहरातील मुजावर कॉलनी, शांतीनगर, खराडे कॉलनी, विठ्ठलनगर, पोस्टल कॉलनी हा भाग ईदगाह मैदानापासून पुढे कार्वे नाक्यापर्यंत आहे. यापूर्वी या विभागात सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे पोलिसांना प्रत्यक्ष या विभागात जाऊन पाहणी करावी लागत होती. मात्र, आता याठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुमारे ३२ कॅमेऱ्यांचा या विभागावर वॉच राहणार आहे. शनिवारी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक निरीक्षक विजय गोडसे, नगरसेवक मोहसिन आंबेकरी यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी या यंत्रणेची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र निरीक्षणाखाली यावे, यासाठी काही सूचनाही यावेळी करण्यात आल्या. कायदा, सुव्यवस्था राबविण्याच्या दृष्टीने हे सीसीटीव्ही फायदेशीर ठरतील, असा विश्वास यावेळी पोलिसांनी व्यक्त केला.
दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर भागातही यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, शहराचा बहुतांश भाग पोलिसांच्या नजरेखाली आहे. मुजावर कॉलनी परिसरात सीसीटीव्ही लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार येथे ही यंत्रणा उभारण्यात आली असून, लवकरच त्याचे लोकार्पणही केले जाणार आहे.