कऱ्हाडच्या प्रदर्शनात मजुरांच्या समस्येवर उतारा
By Admin | Updated: November 24, 2015 00:30 IST2015-11-23T23:05:49+5:302015-11-24T00:30:18+5:30
बारावे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन : दुष्काळनिवारणासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान प्रकल्पावर भर; पाच दिवसांच्या प्रदर्शनात कोटींची उलाढाल

कऱ्हाडच्या प्रदर्शनात मजुरांच्या समस्येवर उतारा
पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी प्रदर्शन म्हणून यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची ओळख आहे. प्रदर्शनाचे यंदाचे बारावे वर्ष असून, पश्चिम महाराष्ट्रातील ‘कृषी’ उत्पादनातील क्रांतीची ओळख या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना घडवून दिली जात असते. पाच दिवस भरविल्या जाणाऱ्या या प्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे, ‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या माध्यमातून कशा प्रकारे दुष्काळ परिस्थितीवर मात करता येऊ शकते. याबाबत शासनातर्फे पाच स्टॉल्सच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी पुढे यावे, शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, या मुख्य हेतूने कऱ्हाड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पाच दिवस भरविल्या जाणाऱ्या या प्रदर्शनास मंगळवारपासून औपचारिक उद्घाटनाने प्रारंभ होणार आहे. पाच दिवसांच्या या कृषी प्रदर्शनासाठी सुमारे ४०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तर त्यातील १०० स्टॉल्स हे प्रगतिशील शेतकऱ्यांकडून मांडल्या जाणाऱ्या उत्तम उत्पादन क्षमतेच्या पिकांसाठी देण्यात आले आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टॉल, खते, औजारे, बी-बियाणे, उत्पादक कंपन्यांचे स्टॉल, कृषी, सहकार, पणन, पशुसंवर्धन आदी शासनाच्या विभागांचे स्टॉल प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. यावर्षी कृषी मालप्रक्रिया उद्योगाबरोबर ‘जलयुक्त शिवार’ अभियानावर भर देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच या प्रदर्शनामध्ये यावर्षी पाणीटंचाई, मजुरांचा प्रश्न, नापिक जमिनीसाठी उपाय आदींची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे़ प्रदर्शन कालावधीमध्ये विविध पीक, फुले, फळे, भाजीपाला, गाय, म्हैस, बैल प्रदर्शन व स्पर्धा, शेळी-मेंढी, श्वान प्रदर्शन व स्पर्धा व पशुपक्षी प्रदर्शन व स्पर्धा घेण्यात येणार आहेत़
पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या कृषी प्रदर्शनात पश्चिम महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने शेतकरी व व्यापारी उपस्थिती लावतात. प्रदर्शनाच्या पाच दिवसांच्या कालावधीत कोटींची उलाढाल होते. शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांची मांडणी या ठिकाणी केली जाते. याचप्रमाणे शेतीबरोबर पशुपक्ष्यांबाबतची माहिती या प्रदर्शनातून पशुपालक शेतकऱ्यांना दिली जाते. या प्रदर्शनाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून उत्तम प्रकारे पार पाडली जाते. महाराष्ट्र शासनाच्या कृषिविभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच जिल्हा परिषदेमार्फत विशेष सहकार्य या प्रदर्शनासाठी केले जाते. प्रदर्शनात राज्य पणन मंडळ, राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळ, वखार महामंडळ, राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ यांचा समावेश असतो.
पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव असे मोठे कृषिप्रदर्शन असल्याने या प्रदर्शनातून कऱ्हाडचे नाव हे राज्यात तसेच देशात पोहोचले आहे. या प्रदर्शनातून लाखो शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राबाबत ज्ञानाचा खजिनाच मिळतो. यंदाच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतीतील बदलांचे सादरीकरण करणार आहेत.
प्रदर्शनाची कृषी आयुक्तांकडून पाहणी
मंगळवारी भरविण्यात येत असलेल्या बाराव्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. या प्रदर्शनाच्या उत्तम नियोजनासाठी प्रशासनाच्या वतीने कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी प्रदर्शनस्थळी नुकतीस भेट देत पाहणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा...
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा नुकताच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आढावा घेतला. तसेच प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पोलीस बंदोबस्त, नो पार्किंग झोन बनविणे, स्वच्छता व रस्ता दुरुस्ती, शासकीय योजनांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी स्टॉल नियोजनबद्ध मांडणी, फ्लेक्सला कर सवलत, कासारशिरंबे येथील हनुमान पाणीपुरवठा योजनेचा ठिबक सिंंचन मॉडेल, जलयुक्त शिवार, महाराजस्व अभियान आदींसह विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स आणि शेतकऱ्यांचे स्टॉल उभारणीबाबत जिल्हाधिकारी मुदगल यांनी सूचना केल्या.
यावर्षी प्रदर्शनासाठी १७ फूट उंच सभामंडप आणि पिलरलेस सुपरस्ट्रक्चरचा वापर केला आहे. प्रदर्शनस्थळी भेट देणाऱ्या शेतकरी व नागरिकांसाठी उत्तम व्यवस्था केली आहे. यावर्षी मेकिंग महाराष्ट्रबाबत स्वतंत्र दालन उभारले आहे.
- संदीप गिड्डे, अध्यक्ष, शुअरशॉट इव्हेंट
असे असणार
प्रदर्शनातील कार्यक्रम
मंगळवारी दुपारी तीन वाजता औपचारिक शुभारंभ व ऊसपीक स्पर्धा
बुधवारी सकाळी दहा वाजता प्रदर्शनाचे मुख्य उद्घाटन व केळी घड प्रदर्शन व स्पर्धा
गुरुवारी, फुले प्रदर्शन व गाय, म्हैस, बैल स्पर्धा
शुक्रवारी, फळे व श्वान प्रदर्शन, स्पर्धा
शनिवारी भाजीपाला पीक स्पर्धा, शेळी, मेंढी, पक्षी प्रदर्शन व स्पर्धा
दुपारी दोन वाजता समारोप समारंभ, बक्षीस वितरण