कोरोनावर लिंबू, संत्री अन् मोसंबीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST2021-04-08T04:39:35+5:302021-04-08T04:39:35+5:30

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक नाना उपाय करू लागले असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फळांनाही मागणी वाढली आहे. गेल्या ...

Extract of lemon, orange and peach on the corona | कोरोनावर लिंबू, संत्री अन् मोसंबीचा उतारा

कोरोनावर लिंबू, संत्री अन् मोसंबीचा उतारा

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक नाना उपाय करू लागले असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फळांनाही मागणी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत मोसंबी, संत्री व लिंबांना मोठी मागणी आहे. मात्र उन्हाळा व वाढती मागणी लक्षात घेता या फळांचे दर महिनाभरापासून गगनाला भिडले आहेत.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना राबवत असताना आता सातारकरदेखील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उपाय करू लागले आहेत.

कोरोना महामारीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू, संत्री, मोंसबी ही फळे प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या तिन्ही रसवर्गीय फळाच्या किमतीत कमालची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बाजारात लिंबूचे भाव तर गगनाला भिडत असल्याचे चित्र आहे. ही फळे व विविध प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वांचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे नागरिक आपल्या आहारात पालेभाज्या व फळांचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढल्याने मोसंब, संत्री व लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. काही महिन्यांपूर्वी तीस रुपये किलो या दराने मिळणारे लिंबू आता ८० रुपयांवर पोहोचले आहेत. मोसंबीदेखील ५० रुपयांवरून १२५ रुपयांवर गेली आहे तर संत्र्यांची आवक कमी झाली असून दरही ४० ते ५० रुपयांवर आहेत.

(चौकट)

४० टक्क्यांनी वाढले दर

सातारा जिल्ह्यात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रकोप कमी होता. तसेच हिवाळा असल्याने लिंबू, संत्री आणि मोसंबी या रसवर्गीय फळांचा फारसा उठाव होत नव्हता. जानेवारीतही हीच परिस्थिती कायम होती. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाचा प्रकोप वाढला. आता मार्च, एप्रिलमध्ये कडक उन्हाला सुरुवात झाल्याने लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. उत्पादन कमी व मागणीत वाढ झाल्याने फळांचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

(चौकट)

मोसंबी औरंगाबाद, संत्री नागपूर तर

लिंबाची विजापूर, पंढरपूरहून आवक

सातारा जिल्ह्यात परजिल्ह्यांतून फळांची आवक मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत दाखल होणारी मोसंबी ही औरंगाबाद येथून तर संत्री ही नागपूर जिल्ह्यातून येते. जिल्ह्यात लिंबाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. हे लिंबू कर्नाटक राज्यातील विजापूर व पंढरपूर येथून जिल्ह्यात येतात.

(पॉइंटर)

प्रतिकिलो दर फेब्रुवारी मार्च एप्रिल

लिंबू ३० ४० ८०

मोसंबी ५० ८० १२०

संत्री २५ ३५ ४०

(कोट)

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. संत्री, मोसंबी, लिंबू ही रसवर्गीय फळे ही उणीव भरून काढतात. त्यामुळे सर्वांनीच फळांचे सेवन करायला हवे.

- विजया बावळेकर, महाबळेश्वर

(कोट)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आपल्याला आपली इम्युनिटी पॉवर वाढविणे गरजेचे बनले आहे. सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळे खाल्ल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्व मिळतात. त्यामुळे मी आहारात यांचा समावेश करते.

- स्वाती डंबे, वाई

(कोट)

विविध जीवनसत्त्व असणारी फळे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. मात्र, त्यांच्या सेवनामुळे कोरोनावर मात करता येईल, असा दावा करता येत नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोना रोखण्यासाठी ती कदाचित उपयुक्त पडू शकते.

- डॉ. प्रताप गोळे, सातारा

(कोट)

फळ व पालेभाज्यांचा आहारात समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आहारात फळांचा कटाक्षाने समावेश करावा. फळे, पालेभाज्यांमुळे शरिराला आवश्यक जीवनसत्व मिळतात.

- डॉ. पौर्णिमा फडतरे, सातारा

Web Title: Extract of lemon, orange and peach on the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.