महागडे मोबाईल हातोहात
By Admin | Updated: November 21, 2015 00:24 IST2015-11-20T21:16:53+5:302015-11-21T00:24:39+5:30
लंपास : चोरट्यांना लागला ‘अॅण्ड्रॉईड’चा लळा; निष्काळजीपणा ठरतोय पश्चातापाचं कारण; पोलीसही हतबल--कऱ्हाड फोकस

महागडे मोबाईल हातोहात
संजय पाटील -- कऱ्हाड--मोबाईल हे खरंतर संपर्काचं साधन; पण सध्या हेच साधन ‘हौस’ म्हणून वापरलं जातंय. बोलण्यापेक्षा मोबाईलचा दिखाव्यासाठीच जास्त वापर होताना दिसतोय. कुणी दहा हजारांचा तर कुणी चक्क पंचवीस, तीस हजारांचा मोबाईलही बिनधास्तपणे वापरतोय; मात्र कधीकधी हा बिनधास्तपणाच पश्चातापाला कारणीभूत ठरत असल्याचे दिसते. महागडे मोबाईल चोरट्यांच्या ‘लिस्ट’वर असून, ते हातोहात लंपासही केले जातायत. बसस्थानक, मंडई, कॉलेज परिसर किंवा अगदी हॉटेलमधूनही मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना सध्या वाढल्या आहेत.
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गेल्या महिन्यात एका मोबाईल चोरास अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून कित्येक मोबाईल हस्तगत केले. संबंधित मोबाईलमध्ये बहुतांश मोबाईल महागडे आणि अॅण्ड्रॉईड होते. संबंधित चोरटा महागडे मोबाईल हेरूनच ते लंपास करायचा. गर्दीच्या ठिकाणी त्याची ही हातचलाखी चालायची. गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही त्या चोरट्याने मोबाईल चोरण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या दाखविल्या. ज्यावेळी चोरट्याची ही हातसफाई पाहिली, त्यावेळी पोलीसही अवाक् झाले. मोबाईलधारकाचा बिनधास्तपणा चोरट्यांच्या पचनी पडत असल्याचे त्यावरून पोलिसांना दिसून आले.
गर्दीच्या ठिकाणी वावरताना बहुतांशजण आपला मोबाईल हातात पकडतात. काहीजण शर्टच्या खिशात तर काहीजण पर्स किंवा सॅकमध्ये ठेवतात. त्यांचा हा निष्काळजीपणा चोरट्यांसाठी फायदेशीर ठरतो. बसस्थानकात तर अनेकजण बसल्या ठिकाणीच मोबाईल ठेवून एसटी पकडण्यासाठी धावतात. त्यामुळे बसस्थानक परिसरात चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. मोबाईलवर बोलणाऱ्या किंवा हातात मोबाईल असणाऱ्यांवर चोरट्यांचा वॉच असतो. अशा व्यक्ती एसटीत चढण्यासाठी गेल्यास गर्दीचा फायदा घेत चोरटे त्यांच्या हातातील किंवा खिशातील मोबाईल बेमालूमपणे लंपास करतात. मोबाईल चोरीस गेल्याचे संबंधिताच्या लक्षात येईपर्यंत चोरटे तेथून पसार झालेले असतात. चोरलेल्या मोबाईलवर कोणाचाही संपर्क होऊ नये, यासाठी चोरटे तेथून बाहेर पडताच मोबाईल बंद करतात. त्यातील सीमकार्ड काढून फेकून देतात. त्यानंतर त्या मोबाईलची पुढे कमी-अधिक किमतीत विक्री केली जाते. पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या अनेक घटना दाखल होतात; मात्र चोरीचे मोबाईल शोधण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने अशा घटनांकडे पोलिसांकडून म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. कालांतराने एखादा चोरटा सापडलाच, तर त्याच्याकडून हस्तगत केलेल्या मोबाईलचे ‘ईएमआय’ क्रमांक काढले जातात.
त्या क्रमांकावरूनच मूळ मालकाला तो मोबाईल परत केला जातो. गेल्या तीन वर्षांत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे २५ लाखांचे मोबाईल लंपास झालेत.
चोरट्यांचे लक्ष : मंडई, बसस्थानक ‘टार्गेट’
कऱ्हाड तसेच मलकापूर शहरातील मुख्य भाजीमंडई, बसस्थानक आणि महाविद्यालय परिसरात मोबाईल चोरीच्या घटना जास्त प्रमाणात घडतात. आठवडा बाजारासह दररोज सायंकाळी या ठिकाणांवर गर्दी असते. याचाच फायदा घेत टोळी सक्रिय होते. पोलीस ठाण्यात आतापर्यंत मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी नोंद आहेत. त्या नोंदीवर नजर टाकली असता सर्वात जास्त मोबाईल चोरी तीनच ठिकाणांवरून होत असल्याचे समोर येत आहे.
अत्यल्प किमतीत खरेदीविक्री
महागडे मोबाईल चोरल्यानंतर ते अत्यंत कमी किमतीत विकले जात असल्याचे वेळोवेळी उघडकीस येते. ज्या मोबाईलची मूळ किंमत दहा ते पंधरा हजार रुपये आहे, असे मोबाईलही अगदी दोन-तीन हजारांना विकले जातात. मिळणाऱ्या पैशातून मौजमजा केली जाते. काहीजण अॅण्ड्रॉईड मोबाईलच्या आकर्षणापोटी असे मोबाईल चोरत असल्याचेही काहीवेळा पोलीस तपासात उघड झाले आहे.
हातात मावेना, खिशातही बसेना !
काही महागड्या मोबाईलची लांबी, रुंदी जास्त असते, असे मोबाईल वापरणे सध्या ‘स्टेटस’चा विषय झाला आहे. मात्र, लांबी, रुंदी जास्त असलेले काही मोबाईल हातात मावत नाहीत. तसेच ते खिशात ठेवावेत तर त्याला खिसा पुरत नाही. त्यामुळे काहीजण असे मोबाईल तासन्तास हातामध्येच पकडतात. तसेच ज्याठिकाणी बसेल तेथेच तो मोबाईल ठेवला जातो. हा बिनधास्तपणा चोरट्यांना फायदेशीर ठरतो. चोरटे अशा पद्धतीने ठेवलेला मोबाईल त्वरित लांबवतात.
आधी गडबड, नंतर पश्चाताप!
बसस्थानकावर पाहिले असता शेकडो प्रवासी एसटीची वाट पाहत बसलेले किंवा उभे राहिलेले पाहावयास मिळतात. महागडा व आकाराने मोठा असणारा मोबाईल ते बिनधास्तपणे हाताळतात. मात्र, त्याचवेळी एसटी आल्यावर मोबाईल शर्टच्या, पॅन्टच्या खिशात, पर्समध्ये, पिशवीत कुठेही टाकून तशीच एसटीकडे धाव घेतली जाते. एसटीत जागा पकडण्यासाठी वाट काढताना सहजपणे चोरटे आपला डाव साधतात. त्यानंतर मोबाईलधारकावर पश्चाताप करण्याची वेळ येते.
‘डाटा’चा होऊ शकतो गैरवापर
मोबाईल चोरीस गेल्यावर त्यामध्ये साठविलेली सर्व माहिती, फोटो चोराच्या हातात पडते. त्याचा कदाचित गैरवापर होण्याची शक्यता असते.
चोरीस गेलेल्या मोबाईलचा वापर करून मोठा गुन्हा केला जाऊ शकतो. असे अनेकदा घडल्याची पोलिसांत नोंद आहे.
आर्थिक भुर्दंड आणि सीमकार्ड पुन्हा मिळविण्यासाठी होणारा मन:स्ताप, पोलीस ठाण्याचे हेलपाटे मारावे लागणे, यामुळे अनेकजण तक्रार देण्याचे टाळतात.
सीमकार्डसह मोबाईल हॅन्डसेट ब्लॉक करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी त्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत मोबाईलमध्ये अन्य बदल होऊ शकतात.
मोबाईल चोरीस गेल्यानंतर काहीजण तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातात. मोबाईल जास्तच महागडा असेल किंवा मोबाईलसोबत अन्यही काही वस्तू चोरीस गेल्या असतील तर पोलीस रितसर चोरीची तक्रार नोंदवून घेतात. मात्र, फक्त मोबाईल चोरीस गेला असेल तर पोलिसांकडून त्याला जास्त महत्त्व दिले जात नाही. चोरीची तक्रार घेण्याऐवजी अनेकवेळा पोलीस गहाळ रजिस्टरला नोंद करून तक्रारदाराची बोळवण करीत असल्याचे दिसते.