अपेक्षा लवंगीची... फुटला अ‍ॅटमबॉम्ब!

By Admin | Updated: October 20, 2014 22:36 IST2014-10-20T21:41:41+5:302014-10-20T22:36:16+5:30

उत्कृष्ट तयारी : विक्रमसिंह पाटणकरांच्या बालेकिल्ल्यातील गावांमध्येही शंभूराजांनी पाच वर्षांत उभारले जाळे

Expectation of the stomach ... festive atom bomb! | अपेक्षा लवंगीची... फुटला अ‍ॅटमबॉम्ब!

अपेक्षा लवंगीची... फुटला अ‍ॅटमबॉम्ब!

अरुण पवार - पाटण -नेहमीप्रमाणे हजार-पाचशेच्या घरात जय-पराजय ठरेल, असा अंदाज असतानाच १८८२४ चे भरभक्कम मताधिक्य घेऊन शंभूराज देसाई विधानसभेत प्रवेशकर्ते झाले आणि दिवाळीच्या तोंडावर लवंगी फटाके फुटण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पाटण मतदारसंघात चक्क अ‍ॅटमबॉम्ब फुटला! मागील निवडणुकीत अत्यल्प मताधिक्याने विक्रमसिंह पाटणकर निवडून आले होते. पराभवाचे शल्य नुसतेच मनात न बाळगता शंभूराज देसाई यांनी २००९ नंतर लगेच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केल्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे.

२००९ मध्ये केवळ ५८० मतांनी झालेला पराभव चटका लावणारा असला तरी दुसऱ्यात दिवशी बाहेर पडून २०१४ च्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या शंभूराज देसाई यांनी अगदी मतदान तोंडावर येईपर्यंत मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला. प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर जाऊन, ‘आमदार पाटणकर तुमच्या गावात आले का,’ याच मुद्द्याला हात घालून प्रचार केला. दुसरीकडे, आमदार असूनही जनसंपर्कासाठी कमी वेळ दिल्यामुळे आणि कार्यकर्त्यांची फळी दुबळी निघाल्यामुळे पाटणकर पिता-पुत्रांना मोठा पराभव सहन करावा लागला. त्यातच पाटण, कोयना या त्यांच्या बालेकिल्ल्यातीलच १२ हजारांचे मताधिक्य गायब झाले. त्याच्या कारणांचा पाटणकर शोध घेतीलच; पण काही जणांनी पडद्याआड राहून शंभूराज देसाईंना मदत केल्यामुळेच हा बालेकिल्ला हातून गेल्याची चर्चा आहे.
आजतागायत शंभूराज देसाईंना कोयना विभागातील गावांमधून कधीच मताधिक्य मिळाले नव्हते, ते मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत मिळाले. ते १६० इतके होते. तिथेच पाटणकर गटाचे रथी-महारथी अवाक झाले. त्यानंतर कोयना (हेळवाक) व पाटण गटातून सत्यजित पाटणकरांना जवळपास १५ हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते, ते तीन हजारांवर घसरले. यातच शंभूराज देसाईंचा गनिमी कावा यशस्वी झाल्याचे दिसून आले.
पाटण शहरातील एक-दोन मतदानकेंद्रांवर तर देसाई-पाटणकर ‘फिफ्टी-फिफ्टी’ कौल निघाला. शंभूराज यांचा घरचा मतदारसंघ मरळी-मोरणा भाग तर यावेळी पेटून उठल्याचे दिसून आले. या ठिकाणी जवळपास ४ हजारांचे मताधिक्य देसाईंना मिळाले. त्यानंतर चाफळ-तारळे विभागातील गावांनीदेखील पाटणकरांना साथ दिली नसल्याचे दिसून आले. म्हणूनच शंभूराज देसाई १४ व्या फेरीपर्यंत सत्यजित पाटणकरांना जोरदार टक्कर देत राहिले. त्यानंतर मल्हारपेठ, ढेबेवाडी, कुंभारगाव, सुपने, तांबवे या विभागातील सर्व गावांनी शंभूराजांना डोक्यावर घेतल्याचे दिसले. एकंदरीत मतदारसंघातील सर्वच विभागांतून शंभूराज देसाई अग्रेसर राहिले आणि पाटणकर पिता-पुत्रांचे नियोजन कोलमडल्याचे निकालावरून दिसून आले. (प्रतिनिधी)

सत्यजित यांना स्वीकारले नाही
तत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांना मंत्रिपदही मिळाले होते. त्यापूर्वी २० वर्षे आमदार असल्याने त्यांचा कार्यकर्ता प्रत्येक गावात भक्कम होता. विक्रमसिंहांच्या विचारसरणीच्या व्यक्ती गावेच्या गावे सांभाळत. मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी सत्यजितसिंहांना पुढे केले. त्यातच गुणाचा ‘ईगो’ दुखावला, तर कुणाची नापसंती, यामुळे पाटणकर गटात चैतन्य दिसले नाही. विक्रमसिंह मैदानात असते तर कदाचित चित्र काहीसे वेगळे दिसले असते.

चिकाटी कामी आली
पाटणकरांच्या ध्यानी-मनीही नसेल, तेव्हापासून शंभूराज यांनी पाटण तालुका गाववार पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. जाईल तेथे, प्रत्येक गावात कार्यकर्ते ‘चार्ज’ केले. नुसतेच ‘चार्ज’ केले नाहीत तर ते शेवटपर्यंत तसेच राहतील याची काळजी घेतली. त्यामुळे देसार्इंची सुप्त लाट सतत तालुक्यात राहिली.


मतदारांनी
केली तुलना
शंभूराज देसाई विक्रमसिंह पाटणकरांशी निकराने झुंजले, यातच त्यांचा आक्रमक स्वभाव मतदारांना भावला. सतत काठावरचा पराभव होतो, ही सहानुभूती होतीच.
दुसरीकडे सत्यजित पाटणकर यांचा शांत, मितभाषी स्वभाव आणि वक्तृत्वही काहीसे फिके.
तरुण मतदारांनी या दोहोंची या बाबतीत तुलना केल्याचे जाणवले.

भूमिका स्पष्ट केल्याचा फायदा
शंभूराज देसाई शिवसेनेचे; मात्र तालुक्यात ‘देसाई गट’ म्हणूनच गवगवा. केंद्रात मोदी सरकार आले, तशी देसाईंनी आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेनेचे वातावरण तयार केले. उद्धव ठाकरे यांना पाटणमध्ये आणून सभा घेतली. याचा फायदा झाला आणि तालुक्यातील मुंबईकर-पुणेकर देसाईंचे झाले.

Web Title: Expectation of the stomach ... festive atom bomb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.