सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाला लॉकडाऊनमधून वगळा : गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:37 IST2021-04-06T04:37:52+5:302021-04-06T04:37:52+5:30
मायणी : ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सोमवारपासून मिनी लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मिनी लाॅकडाऊनमधून सलून व्यवसाय ...

सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाला लॉकडाऊनमधून वगळा : गायकवाड
मायणी : ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सोमवारपासून मिनी लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मिनी लाॅकडाऊनमधून सलून व्यवसाय व ब्युटी पार्लर व्यवसाय वगळावा,’ अशी मागणी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी नाभिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत निवेदनातील अधिक माहिती की, राज्यात गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
कमी-जास्त प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे सातत्याने सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद राहत आहेत. त्यामुळे हाताच्या पोटावर जगणारा हा समाज कोरोनामुळे अडचणीत सापडला आहे. उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे तसेच कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनीही पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर नाभिक समाज पुरता हवालदिल झाला आहे.
लॉकडाऊन काळात १६ बांधवांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे.
आपल्या सरकारकडे वारंवार आर्थिक मदतीची विनंती तथा निवेदन देऊनही आपण अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही. आमच्या नाभिक समाजाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोर पालन करून शासनास नेहमीच सहकार्य केलेले असून, आजवर आमच्या सलून तथा ब्युटी पार्लर व्यवसायातून संसर्ग झाल्याचे ऐकिवात नाही.
मग आमच्याच व्यवसायावर हा अन्याय का?
इतर सर्व व्यवसायांना लॉकडाऊन काळात वेळेची सवलत देऊन आमचाच व्यवसाय बंद करून एक प्रकारे सकल नाभिक समाजावर हा अन्यायच केला नाही का? ग्राहक वर्गाचीही योग्य ती खबरदारी, काळजी घेऊन मोडकळीस आलेला आमचा व्यवसाय सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
असे असताना पुन्हा लॉकडाऊन लादून समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करण्यासाठी समाजावर नाईलाजाने रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल आणि याची सर्व जवाबदारी सरकारवर असेल याची नोंद घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.