कोरेगाव तालुक्यात गणरायाचे उत्साहात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:30+5:302021-09-11T04:41:30+5:30
कोरेगाव : गणरायाचे कोरेगाव शहर व तालुक्यात उत्साहात आगमन झाले. शुक्रवारी देखील पावसामुळे बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्या भाविकांचा ...

कोरेगाव तालुक्यात गणरायाचे उत्साहात आगमन
कोरेगाव : गणरायाचे कोरेगाव शहर व तालुक्यात उत्साहात आगमन झाले. शुक्रवारी देखील पावसामुळे बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्या भाविकांचा हिरमूड झाला. आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी उत्साहात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी कुटुंबीय, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर तर कठोर नियम लादण्यात आले आहेत. त्यामुळे एकाही मंडळाने मिरवणूक काढलेली नाही. तालुक्यात ३९७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची स्थापना केली असून, घरगुती गणपतींची संख्या २८ हजार ६०० एवढी आहे. ९० गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ योजना राबविण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह २०७ जणांना सामाजिक शांतता ठेवण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी दिली. एक गुन्हेगारी टोळी हद्दपार करण्यात आली असून, अजून एक टोळी हद्दपार करण्याचा आणि दोन अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शांततेचा भंग होऊ नये, यासाठी ५७ जणांवर बंधने घालण्यात आली असून, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. गणेशमूर्ती स्थापना वेळी एकाही मंडळाने मिरवणूक काढलेली नाही. विसर्जन दिवशी देखील मिरवणूक न काढण्याचे आदेश देण्यात आल्याचे किंद्रे यांनी सांगितले.