पालकमंत्रीपद स्वतःला, आपल्या पक्षाला मिळावे असे प्रत्येकाला वाटते - मंत्री शंभूराज देसाई
By प्रमोद सुकरे | Updated: December 24, 2024 19:34 IST2024-12-24T19:33:44+5:302024-12-24T19:34:46+5:30
ते खासदार उदयनराजेंचे व्यक्तीगत मत

पालकमंत्रीपद स्वतःला, आपल्या पक्षाला मिळावे असे प्रत्येकाला वाटते - मंत्री शंभूराज देसाई
कराड : पालकमंत्री पद स्वतःला मिळावे, स्वतःच्या पक्षाला मिळावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र हा अधिकार आम्हाला कोणालाच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा तो अधिकार आहे. जोपर्यंत या तिघांचे पालकमंत्री कोणाला करायचे यावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण जर खासदार उदयनराजे याबाबत काही बोलले असतील तर ते त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते असे मत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
सातारा जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात ४ कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. पण अजून जिल्ह्याचा पालकमंत्री ठरलेला नाही. यावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनी तर पालकमंत्री पद शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावे असे जाहीर मागणी केलेली आहे. त्यामुळे उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.याबाबत माध्यमांनी छेडले असता मंत्री देसाई बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर पर्यटनासारखी महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला मोठी संधी असून ऐतिहासिक परंपरा असलेल्या गड किल्ले यांचे संवर्धन करुन गडकोट पर्यटन वाढवण्यावर भर देणार आहे. आत्ताच्या पर्यटन स्थळांमध्ये आधुनिक सुधारणा करुन विकास केला जाणार आहे.महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत शासनाची भुमिका काय आहे? याबाबत छेडले असता मंत्री देसाई म्हणाले, पूर्वीच्या मंत्र्यांनी काय केलेले आहे? स्थानिकांचा किती सहभाग आहे? त्या सर्वांचा आढावा घेऊन याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.