आनंदाच्या शिधाचा नाही पत्ता; गौरी-गणपतीचा सण तीन आठवड्यावर, गोरगरिबांसमोर मोठा प्रश्न उभा

By दीपक देशमुख | Updated: August 5, 2025 16:51 IST2025-08-05T16:51:29+5:302025-08-05T16:51:50+5:30

लोकानुनय करणाऱ्या घोषणा करताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागत असल्याने सरकारची दमछाक

Even though Ganpati Bappa's arrival is just three weeks away, the government has not yet announced the Anand Shidha | आनंदाच्या शिधाचा नाही पत्ता; गौरी-गणपतीचा सण तीन आठवड्यावर, गोरगरिबांसमोर मोठा प्रश्न उभा

आनंदाच्या शिधाचा नाही पत्ता; गौरी-गणपतीचा सण तीन आठवड्यावर, गोरगरिबांसमोर मोठा प्रश्न उभा

दीपक देशमुख

सातारा : गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या तीन आठवड्यावर आले तरी शासनाकडून आनंदाच्या शिधाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा शिधा मिळणार काय ? असा सवाल गोरगरीब जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. शासनाने ऐनवेळी घोषणा केल्यास शासनाच्या वितरण व्यवस्थेवरही मोठा ताण येणार असून, सण संपल्यानंतर लोकांच्या हाती शिधा पडणार आहे. त्यामुळेच वेळीच निर्णय करून गरिबांचा सण गोड करावा, अशी मागणी होत आहे.

शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने वर्षभरातील महत्त्वाच्या सण - उत्सवात लाभार्थींना शंभर रुपयात आनंदाच्या शिधाचे वितरण करण्यात येते. गेल्यावर्षी गौरी-गणपतीचा सण ७ सप्टेंबर २०२४ रोजी होता. त्यावेळी आनंदाचा शिधा देण्याचा शासननिर्णय जवळपास दोन महिने अगोदर दि. १२ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला होता. तरीही सणादिवशी अनेकांना शिधा मिळाला नाही. पितृ पंधरवडा संपल्यानंतरही वाटप सुरूच होते. म्हणजेच जिल्ह्यातील सुमारे ४ लाख शिधासंच वाटपाला दोन महिनेही अपुरे पडले. 

यंदा ४.२८ कार्डधारक आहेत. गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला असून, तीन आठवडे उरलेत. तरीही शिधाची अधिकृत घोषणा झालेली नाही. ऐनवेळी घोषणा केल्यास वाटपाचे नियोजन करून शिधा हाती पडायला उशिर होणार आहे. त्यामुळे गरिबांचा सण शासन गोड करणार का, असा प्रश्न उपस्थित आहे.

शासनाची दमछाक

लोकानुनय करणाऱ्या घोषणा करताना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागत असल्याने सरकारची दमछाक होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. याच आर्थिक ताणामुळे अनेक शासकीय कामांची बिले रखडल्याचा आरोप होत आहे. आता ‘आनंदाचा शिधा’ रखडतोय का, असा सवाल उपस्थित होत असून, नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

प्रशासनावरही ताण 

आनंदाच्या शिधाच्या निविदा, शिधा जिन्नसाचा संच बनवणे, प्रत्येक जिल्ह्यातील गोदामात पोहोच करणे आणि तेथून स्वस्त धान्य दुकानापर्यंत नेण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. मात्र, ऐनवेळी घोषणा केल्यास 'आनंदाचा शिधा' वेळेत देणे शक्य होणार नाही.

मागील शिधासंचातील जिन्नस शंभर रुपयात

योजना जाहीर झाल्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांकडून आनंदाचा शिधा शंभर रुपयात देण्यात येतो. यामध्ये प्रत्येकी एक किलो चणाडाळ, साखर, रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल असा शिधासंच मिळतो.

Web Title: Even though Ganpati Bappa's arrival is just three weeks away, the government has not yet announced the Anand Shidha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.