उन्हाळी सुटीतही शाळेच्या भिंती लागल्या बोलू
By Admin | Updated: May 10, 2017 22:53 IST2017-05-10T22:53:47+5:302017-05-10T22:53:47+5:30
उन्हाळी सुटीतही शाळेच्या भिंती लागल्या बोलू

उन्हाळी सुटीतही शाळेच्या भिंती लागल्या बोलू
लोकमत न्यूज नेटवर्क
सायगाव : एकीकडे सुगम-दुर्गम अशी बदल्यांची वर्गवारी केल्यामुळे संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील शिक्षक अस्वस्थ आहेत. तर आपली बदली कोठेही होऊ आपण केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवतेकडेच लक्ष देणार, असा सेवेत येतानाच निश्चय केलेल्या रोहिदास भोसले या शिक्षकाने उन्हाळी सुटीतही शाळा सुरू ठेवली आहे. जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ शाळेच्या भिंती भोसले यांच्या उपक्रमामुळे उन्हाळी सुटीतही बोलू लागल्या आहेत. त्यांचा हा आदर्श जिल्ह्यातील शिक्षकांनी घेण्यासारखा असा आहे.
एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ओस पडू लागलेल्या पाहायला मिळत आहेत. तर ज्या ठिकाणी विद्यार्थी पट टिकून आहे. त्याठिकाणी गुणवत्ता टिकवण्यासाठी शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागत आहेत. सध्या प्रथमिक शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने सुटी लागण्यापूर्वीच उन्हाळी सुट्यांचे नियोजन केले आहे.
काही शिक्षक हे सुगम-दुर्गम बदल्यांच्या टेंशनमध्ये आहेत. मात्र खर्शी तर्फ कुडाळ शाळा ही शेजारी दोन हायस्कूल असल्यामुळे आपला पट टिकवून ठेवण्यासाठी तसेच गुणवत्ता टिकवण्यासाठी उन्हाळी सुटीतही ८ ते ११.३० या वेळेत सुरू असलेली पाहायला मिळत आहे. शाळेतील एकमेव शिक्षक रोहिदास भोसले हे नियमितपणे पाचवी ते सातवीचे विद्यार्थी घेऊन उन्हाळी वर्ग घेत आहेत.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय घेऊन त्याचा या उन्हाळी वर्गासाठी उत्साह वाढवण्याचे काम भोसले करीत आहेत. या उपक्रमाचे शिक्षणप्रेमींकडून कौतुक होत आहे. तर गट शिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी कल्पना तोडरमल, केंद्रप्रमुख संपत धनावडे यांनी देखील शिक्षक रोहिदास भोसले यांच्या या उन्हाळी वर्गांना भेटी दिल्या आहेत.
गुणवत्तेची परंपरा सांभाळणारी शाळा
पहिली ते सातवीपर्यंतच्या या प्राथमिक शाळेत ९५ पट आहे. तर चारच शिक्षक काम करतात. त्यामुळे गुणवतेचा शिवधनुष्य शाळेतील विद्या चिंचकर, माधुरी फरांदे, कमल टोनपे, रोहिदास भोसले या शिक्षकांना पेलावा लागतो. या शिक्षकांनी जवळपास ४ लाखांचा शैक्षणिक उठाव शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण भोसले व ग्रामस्थांच्या मदतीने करून नुकतीच शाळा आयएसओ केली आहे. तर दरवर्षी शाळेतील विद्यार्थी हे शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, क्रीडा स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत असल्यामुळे दोन हायस्कूल शाळेंशी स्पर्धा करीत या प्राथमिक शाळेने आपल्या शाळेचा पट टिकवण्याबरोबरच शाळेची गुणवत्तेची परंपरा देखील सांभाळली आहे.