फलटण : ‘आमच्यामुळे राज्यात परिवर्तन होऊन सत्तेत बसलात. आमच्यामुळे सत्ता येऊ शकते तर आम्ही आमची सत्ता आणूही शकतो, एवढे लक्षात ठेवा. आम्ही लढणारे असून, मंत्रिपदासाठी भीक मागणारे नाही. राष्ट्रीय पक्षाना मस्ती आली असून, सत्ता बदलली तरी सिस्टीम बदलली नाही,’ असा घणाघात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी भाजपचे नाव न घेता केला. दरम्यान, दुधाला दारूच्या बाटलीएवढा तरी भाव द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोमंथळी, ता. फलटण येथे आयोजित दूध परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, अॅड. नरसिंह निकम, चेतन शेट्टी, सागर खोत, बंजरग खटके, बजरंग गावडे, अमोल खराडे, विराज खराडे, संतोष ठोंबरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जानकर म्हणाले, ‘सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना, विजेचा प्रश्न ऐरणीवर असताना जर विद्युतवितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांची वीजबिलाअभावी कनेक्शन तोडल्यास आम्ही आक्रमक भूमिका घेऊ. एकाही शेतकऱ्यांनी विजेचे बिल भरून नये. राष्ट्रीय समाज पक्षाला गुजरात, ओडीसा, कर्नाटक, गोवा या राज्यांत निवडणूक लढविण्यास मान्यता मिळाली असून, कार्यकर्त्यांनी सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात. यापुढे जिथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व रासपचा उमेदवार उभा असेल तिथेच आपण वेळ देणार आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, ‘राज्यामध्ये सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ३५५ तालुक्यांपैकी २७८ तालुक्यांत पाऊस नाही. बाकीच्या तालुक्यांत ५९ टक्के पावसाची नोंद आहे. फलटण तालुक्यातील ही अनेक गावे दृष्काळग्रस्त आहेत. या भागातील बहुतांश शेतकरी दूध व्यवसायावर अवंलबून असून, आत्ताच्या परिस्थितीत चारा, पाणी, दुधाला भाववाढ आदी मागण्या शेतकऱ्यांकडून होत आहे’ दुधाला मात्र १७ रुपये दर... सध्या शासनाकडे ५० लाख लिटर दूध संकलन आहे तर खासगी दूध कंपन्याकडे ९० लाख लिटर संकलन होत आहे. पॅकिंगमध्ये ६५ लाख लिटर दूध विकले जात आहे; परंतु सध्या गाईच्या दुधाला मराठवाड्यात १५ ते १६ लिटर भाव तर फलटणमध्ये १७ ते १८ तर सांगली, कोल्हापूरला २१ ते २२ रुपये दराने घेतले जाते. परत हेच दूध पॅकिंगमध्ये ४० रुपये लिटरने विकले जाते. पाण्याची बाटलीही २० रुपये लिटरने तर दारूची बाटली ६० रुपयांनी विकली जाते. दुधाला मात्र १७ रुपये दर आहे. दुधाला दारूच्या बाटलीएवढा तरी भाव द्या, असा टोला सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला लगावला.
दारूच्या बाटलीएवढा तरी दुधाला भाव द्या
By admin | Updated: March 20, 2016 00:26 IST