मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:09+5:302021-06-27T04:25:09+5:30
सातारा : मराठा धनगर व मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, मागासवर्गीयांची पदोन्नती तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षण या प्रमुख प्रश्नाकडे लक्ष ...

मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचा एल्गार
सातारा : मराठा धनगर व मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, मागासवर्गीयांची पदोन्नती तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षण या प्रमुख प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवार, २६ पासून सातारा ते राजभवन मुंबई अशी सर्वपक्षीय पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेच्या फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र प्रमुख अमोल आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली, तर आठ दिवसांत पदयात्रा राजभवन येथे पोहोचेल, अशी माहिती आवळे यांनी दिली.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्रात लाखोंच्या उपस्थितीत ५८ मूक मोर्चे निघाले होते. त्यात अनेक तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. तरीसुद्धा अशा विषयावर केंद्र सरकारकडून गंभीर विचार झालेला नाही. त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा होणे गरजेचे आहे, तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रिम कोर्टाकडून रद्द करण्यात आले असून, तेही आरक्षण केंद्र सरकारकडून पूर्ववत होणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात जनमानसामध्ये तीव्र भावना उसळल्या आहेत. त्या भावना राजभवन कार्यालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मराठा, धनगर व मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी सर्व पक्षीय संघटनांनी स्वराज्याची राजधानी सातारा ते राजभवन अशा पदयात्रेस प्रारंभ केला आहे. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. तर आठ दिवसात पदयात्रा राजभवन येथे पोहोचणार आहे, तर दररोज ४५ किलोमीटरचा प्रवास केला जाणार असून, पहिला मुक्काम वेळे येथे आणि दुसरा पुणे येथे होणार आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रासपचे भाऊसाहेब वाघ, राष्ट्रवादीचे जयेंद्र लेंभे, आरपीआयचे किशोर सोनावणे, अल्पसंख्याक सेल राष्ट्रीय काँग्रेसचे हमीदभाई पठाण, भाजपचे नितीन चव्हाण, शिवसेनेचे दत्ता जाधव आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील पोवई नाक्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते नारळ
वाढवून
आरक्षणप्रश्नी पदयात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी अमोल आवळे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.