हत्ती भावनिकदृष्ट्या नाजूक;
By Admin | Updated: January 4, 2015 00:51 IST2015-01-04T00:49:46+5:302015-01-04T00:51:00+5:30
पण चिडचिड झाल्यास घातक

हत्ती भावनिकदृष्ट्या नाजूक;
सातारा : हत्ती हा अत्यंत शांत व समजूदार प्राणी आहे. शाकाहारी असल्यामुळे आक्रमक नसून सोशिक व संयमी आहे. तसेच भावनिक दृष्ट्या नाजूक असा हा महाकाय प्राणी आहे. हत्तीच्या शरीरात घामाच्या ग्रंथी नसतात. त्यामुळे शरीराचे तापमान जेव्हा वाढते, तेव्हा ते शमविण्यासाठी हत्ती कानांची हालचाल करतो. कारण त्याच्या कानांमध्ये रक्त वाहिन्यांचे जाळे असते. रक्ताभिसरण नियमित करून तो शरीराचे तापमान संतुलित राखतो. याव्यतिरिक्त पाणी, गवत, माती अंगावर टाकून तो तापमान शमविण्याचे प्रयत्न करताना नेहमी दिसते. गर्दीच्या ठिकाणी कोलाहलाव्यतिरिक्त गर्दीमुळे तापमान वाढलेले असते. त्यामुळे आपसूक हत्तीची चिडचिड होऊ लागते. म्हणूनच गर्दीच्या ठिकाणी हत्ती नेणे धोक्याचे ठरू शकते.
हत्ती स्वत: कोणावरही हल्ला करत नाही. त्याला डिवचले तर तो त्याची प्रतिक्रिया देतो. देहाप्रमाणेच छोटीशी प्रतिक्रियाही मोठे नुकसान करून माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्याच्या शरीराला काही इजा झाली तर किंवा डोळ्याला काही वस्तू लागून डोळ्याला अंधारी आली तर त्याची चिडचिड वाढू शकते. त्याने दिलेल्या नैसर्गिक प्रतिक्रियेनेसुद्धा माणसाचा मृत्यू होऊ शकतो.