वीज चोरीचा ‘भार’ गावावर !

By Admin | Updated: May 5, 2017 22:55 IST2017-05-05T22:41:50+5:302017-05-05T22:55:40+5:30

वीज चोरीचा ‘भार’ गावावर !

Electricity thief 'burden' on the village! | वीज चोरीचा ‘भार’ गावावर !

वीज चोरीचा ‘भार’ गावावर !


लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव हवेली : येथील वीजवितरण कंपनीचे कार्यालय या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या वडगाव हवेली या एकाच गावावर जादा वीज चोरीचा ठपका ठेवत अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यातून संपूर्ण गाव वेठीस धरण्यात आले असून, जखम मांडीला व मलम शेंडीला, असा प्रकार सुरू आहे. वीजवितरण कंपनीच्या टेंभू उपकेंद्राअंतर्गत कार्वे, वडगाव हवेली, कोरेगाव, टेंभू आदी गावांना वीजपुरवठा केला जात होता. गत दोन वर्षांपासून वडगाव हवेली येथे नवीन उपकेंद्र्राची निर्मिती झाल्यानंतर वडगाव हवेलीला या उपकेंद्रामधून वीजपुरवठा केला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिवसा अथवा रात्री अघोषित भारनियमन लागू करण्यात आले आहे. सध्या सर्वत्रच समान भारनियमन लागू असेल अशी लोकांची समजूत झाली. मात्र, परिसरातील कोणत्याच गावामध्ये अशा पद्धतीने भारनियमन केले जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीमार्फत वीजवितरण कार्यालयाला विचारणा केली असता इतर गावांच्या तुलनेत गावामध्ये वीज चोरीचे प्रमाण जास्त असून, जादा चोरी होत असल्याने इतर गावांपेक्षा जादा काळ भारनियमन करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आल्याचे सांगण्यात आले.
दि. १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी भारनियमनाचा विषय मांडत इतर गावांमध्ये भारनियमन केले जात नसून येथेच का केले जाते?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वीज चोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असताना नियमित बिल भरणाऱ्यांना हा भुर्दंड का?, असेही विचारण्यात आले.
यावर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव मांडण्यात आला.
सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट होत चालली आहे. शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अहोरात्र प्रयत्न करूनही विजेमुळे पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागते. कधी फ्यूज गेल्याने तर कधी इतर अडचणींमुळे वीज खंडित होते. शेतीला पाणी देण्यासाठी मजूर लावणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावामुळे विनाकारण पैसे मोजावे लागत आहेत. अशातच वीज कंपनीने अघोषित जादा भारनियमन करून शेतऱ्यांना आणखीनच अडचणीत टाकले आहे.

Web Title: Electricity thief 'burden' on the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.