एकीकडं निसर्गपूजा तर दुसरीकडं होळी!
By Admin | Updated: March 18, 2016 23:57 IST2016-03-18T21:46:04+5:302016-03-18T23:57:15+5:30
डोंगर पेटले : पाटण तालुक्यातील वनसंपदा होतेय खाक; पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता

एकीकडं निसर्गपूजा तर दुसरीकडं होळी!
पाटण : ‘निसर्गाचा नाश झाला की मानवाचा आपोपच नाश होतो,’ असं म्हटलं जातं. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून शासकीय यंत्रणा व काही निसर्गप्रेमी झटत आहेत. जेजुरीहून काही मंडळी येऊन काऊदऱ्यावर निसर्ग पूजा करून गेले. एकीकडे हे विधायक काम दिसत असतानाच काही विघ्नसंतोषी मंडळी वणवे लावून डोंगरच्या डोंगर पेटवून देत आहेत. वनांची चाललेली होळी पाहावत नाही.
निसर्गपूजा ही खरोखरच एक आगळीवेगळी घटना आहे. यातून हरितसंपत्ती जपण्याचे संस्कार भावी पिढीवर होत असतो; पाटण तालुक्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. कोयना धरणामध्ये अमृतासमान भव्यदिव्य जलाशय आहे. हे सांभाळण्यासाठी वन्यजीव आणि वन्यविभाग आहे. मात्र निसर्गाचे जतन करण्यासाठी हवा तेवढा लोकसहभाग दिसून येत नाही.
काही विघ्नसंतोषी मंडळी क्षणिक आनंदासाठी किंवा गैरसमजुतीतून जंगले पेटवून देत आहेत. यामध्ये दुर्मीळ वनौषधी, जीव-जंतू जळून खाक होत आहेत. या मंडळींच्या वक्रदृष्टीतून जंगलांना वाचविण्यासाठी कायद्याचा धाक आणि कठोर कारवाई होण्याची गरज आहे.
गावोगावच्या नवसंरक्षण समित्या निर्दिस्त झाल्यासारख्या आहेत. त्यामुळे गावागावांतील जंगल, डोंगर रात्रंदिवस वणव्याने करपून निघत आहेत. मात्र, हा प्रकार कोणाच्याच लक्षात येत नाही.
मोरणा विभागातील पवनचक्क्यांनी डोंगर, आसपासचे जंगल व्यापले आहे. तर कोयनेकडील घाटमाथा, नवजा हा अभयारण्य घोषित परिसर दिवसाढवळ्या राखरांगोळी होताना पाहावत नाही.
वनविभाग एकीकडे वृक्षलागवडीसाठी तयारीत असताना दुसरीकडे वणव्यात हजारो लहान-मोठी झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत. यावर गांभीर्याने विचार होत नाही. वृक्षलागवडीसाठी शासनाचे अनुदान, लाखोंचा पैसा खर्च होतो. त्यात वनकर्मचारी उत्साह दाखवितात; मात्र वणवे विझविण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत.
एखाद्या पर्यावरणविषयक कार्यक्रमात तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मंडळी पुढे-पुढे जाऊन टेंभा मिरवत असतात. त्याचप्रमाणे निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वणवा उपग्रहावर
कोयना व चांदोली अभयारण्यांत आता वणवा लागला गेल्यास उपग्रहाद्वारे तत्काळ दिल्ली येथील वन्यजीव विभागाकडे संदेश जातो. उपग्रहाद्वारे वणवा नेमका कोठे लागला, हे कळते. त्यानंतर हालचाली घेऊन वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केला जातो.
मोरगिरी वनक्षेत्रात वणवा लागण्याच्या दोन घटना घडल्या; मात्र वनक्षेत्रापेक्षा खासगी डोंगरांना वणवा लागल्याचे प्रकार जास्त घडत आहेत. वनविभाग किंवा वनीकरणातर्फे वृक्षलागवड केलेले क्षेत्र आहेत. तिथेच जाळरेषा आखल्या आहेत. यापद्धतीने ग्रामस्थांनी सर्वच डोंगरांना जाळरेषा आखाव्यात.
- व्ही. आर. काळे, वनक्षेत्रपाल, पाटण