सुशिक्षितांच्या अशिक्षितपणाचा कळस !
By Admin | Updated: December 1, 2014 00:22 IST2014-11-30T21:08:40+5:302014-12-01T00:22:25+5:30
रस्त्यालगतच कचऱ्याचे ढीग : शिकल्या-सवरलेल्यांकडूनच स्वच्छतेला हरताळ

सुशिक्षितांच्या अशिक्षितपणाचा कळस !
मलकापूर : देशभर ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरूच आहे़ मलकापूर नगरपंचायतीनेही या अभियानाची जोमात सुरुवात केली आहे़ मात्र सुशिक्षित म्हणवून घेणारे नागरिकच रस्त्याकडेला कचरा टाकत आहेत़ शहराच्या दृष्टीने ही खेदाची बाब
आहे़
डेंग्यूची साथ विचारात घेता मलकापुरात नगरपंचायतीने स्वच्छतेची विशेष मोहीम हाती घेतली आहे़ नगरपंचायतीत ६५ कर्मचाऱ्यांसह ३० ते ३५ महिलांना रोजंदारीवर काम देऊन शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची साफसफाईचे काम करण्यात येत आहे़
सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यालगतची साफसफाईही नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे़ याशिवाय पाच घंटागाड्या गल्लोगल्ली कचरा गोळा करतात. दोन ट्रॅक्टरच्या साह्याने हॉटेलसह व्यावसायिकांचा ओला कचरा गोळा करण्याचे काम सातत्याने सुरू आह़े़
शहरातील मुख्य ठिकाणी २४ कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत़ कचरा गोळा करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुविधा नगरपंचायतीने उपलब्ध केल्या
आहेत़
शहरातील नव्वद टक्के नागरिक सुशिक्षित आहेत. मात्र, सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या काहीनीच अशिक्षितपणाचा कळस केला आहे़ स्वच्छतेबाबत सर्वत्र अनेक उपक्रम सुरू असताना, असे नागरिक राजरोसपणे रस्त्याकडेलाच कचऱ्याचे ढीग टाकत आहेत़
प्रशासन पुढे स्वच्छता करते आणि पाठीमागे ही मंडळी कचरा नाल्यात टाकतात, अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनही हतबल झाले आहे़ (वार्ताहर)
दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान
शिवछावा चौक परिसरात वास्तव्यास असलेली काही शिक्षक मंडळी कचरा घंटागाडीत न टाकता रस्त्याकडेलाच टाकतात. संबंधित शिक्षकांनी इतरांना स्वच्छतेचे धडे देण्याऐवजी त्यांनाच इतरांनी धडे देण्याची वेळ आली़ त्यावरही कहर करून ‘मी कचरा रस्त्याकडेलाच टाकणार तुम्ही कोण विचारणार,’ असा सवाल करून दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, असे म्हणण्याची वेळ आली आहे.